ऑनलाइन लोकमत
संग्रामपूर (जि.बुलडाणा), दि. १६ - सात वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनीच मंगळवारी पंचायत समिती कार्यालयात पुंग्या वाजवून अभिनव आंदोलन छेडले.
तालुक्यातील निरोड येथील जिल्हा परिषदेच्या मराठी उच्च माध्यमिक शाळेत पहिली ते सातवीसाठी तीनच शिक्षक असल्यामुळे शिक्षणाचा खेळ खंडोबा होत आहे. पंचायत समिती सभापती व गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षकांच्या मागणीसाठी वारंवार निवेदन देण्या आले. तसेच शाळेला कुलूप ठोकण्याचे आंदोलनही पालकांकडून छेडण्यात आले. मात्र तरीही या शाळेतील रिक्त असलेले शिक्षकांचे तीन पदे भरल्या गेली नाहीत. परिणामी मंगळवारी १६ आॅगस्ट रोजी या शाळेतील ११८ विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयात येवून पुंगी बजाओ आंदोलन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी गटविकास अधिकारी हिरोळे यांच्या कक्षात जाऊन पुंग्या वाजविल्या. रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरल्या जाणार नाहीत तोपर्यंत विद्यार्थी हे आगळे-वेगळे आंदोलन सुरुच राहणार असल्याची प्रतिक्रीया उपस्थित पालकांनी दिली.