शंकर वाघ / शिरपूर जैनवाशिम, दि. 25 - जैनाची काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या शिरपूर जैन नजिक वाघी रस्त्यावरील मरीमाया माता मंदिराजवळील निंबाच्या झाडामधून पांढरे द्रव्य बाहेर येत असतानाचे पाहून काही युवकांनी एकमेकांना सांगितल्याने ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. अन लगेचच नागरिकांनी तेथे येवून झाडाची पूजा, अर्चा सुरु करुन प्रसाद वाटपासह चमत्कार घडल्याचे बोलणे सुरु केल्याने गणपती दुध पिल्याच्या घटनेची आठवण करुन दिली.
कृषी तज्ञ व अभ्यासकांच्या मते लिंबाच्या झाडामध्ये ह्यलिनोलिक अॅसिडह्ण नावाचा घटक असतो. तो कधी-मधी बाहेर पडतो तर काहींच्या मते अॅझरडीनरॅसिटन नावाचा घटक निंबाच्या झाडामध्ये असतो. तो झाडाच्या पानातून , सालीतून बाहेर काढता येतो. यापासून चांगले किटकनाशकही बनते. झाडाला जखम झाल्यास त्यातून हे द्रव्य बाहेर पडते. एखादया पक्षाने चोचीने झाडाची साल पोखरल्यासही असे द्रव्य बाहेर पडू शकते. असे असतांना मरीमाय माता मंदिरात दर्शनाकरिता आलेल्या एका भाविकाला २५ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान ४० फूट उंच असलेल्या निबांच्या झाडातून पांढरे द्रव्य दिसताचं त्याने चमत्कार झाला असे भासवून सर्वत्र वाऱ्यासारखी बाब पसरवली.
लगेचच भाविकांची गर्दी निर्माण होवून लोकांनी हार, फुले घेवून तेथे प्रसाद वाटपासही सुरुवात केल्याने अंधश्रध्देला खतपाणी देण्यात येत आहे. भाविकांची श्रध्दा असली तरी त्यामागचे शास्त्रीय कारणाचा शोध घेणे गरजेचे होत आहे. येथे काही श्रध्दने तर काहींनी कुतूहलाने गर्दी केली होती.