ऑनलाइन लोकमत
नाशिक : येत्या ११ आॅगस्टला रात्री ९.१२ वाजता ध्वजावतरणाने सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता होईल, त्याचवेळी गोदावरीतीरी रामकुंडालगत असलेल्या प्राचीन गंगा-गोदावरी मंदिरालाही कुलूप लागले जाईल. दर बारा वर्षांनी उघडणाºया गंगा-गोदावरी-भागीरथी मंदिराचे कुलूप वर्षातून दोन दिवस उघडले जात असले तरी सदर मंदिर सन २०२७ सालीच भाविकांना संपूर्ण तेरा महिन्यांच्या कालावधीकरिता खुले केले जाईल. दरम्यान, नाशिकमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने सद्यस्थितीत संपूर्ण मंदिरात गाळ साचल्याने मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मात्र कुंभसांगता होण्यास आता अवघे तीनच दिवस उरल्याने भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दर बारा वर्षांनी नाशिकला भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता येत्या ११ आॅगस्टला होत आहे. रात्री ९.१२ वाजता सिंह कन्या राशीत प्रवेश करील त्यावेळी पुरोहित संघाच्या वतीने आयोजित ध्वजावतरण सोहळ्याने गेल्या तेरा महिन्यांपासून सुरू असलेल्या कुंभपर्वाची सांगता होईल. याचवेळी रामकुंडालगत असलेल्या आणि दर बारा वर्षांनी उघडणाºया गंगा-गोदावरी-भागीरथी मंदिरालाही कुलूप लावले जाईल. या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते. गौतम ऋषी यांच्या हातून ब्रह्महत्त्येचे पातक झाल्यानंतर भगवान शंकराच्या जटांमध्ये वास्तव्य करणाºया गंगास्नानानेच त्यांच्यावरील पातक दूर होईल, असा उ:शाप देण्यात आला होता. त्यासाठी गौतम ऋषी यांनी घोर तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले; परंतु गंगामाता काही शंकराच्या जटांमधून बाहेर पडेना. त्यावेळी गंगामातेचा दर बारा वर्षांनी देव, संत, महंत हे विविध ठिकाणचे तीर्थ अर्पण करत गोदावरीचा सन्मान करतील, असे वचन देण्यात आले तेव्हा गंगा-गोदावरी प्रगट झाली. तेव्हापासून दर बारा वर्षांनी सिंहस्थात गोदावरीच्या पूजनाची प्रथा सुरू झाली. त्याचेच प्रतीक मानत एक तपानंतर गंगा-गोदावरी-भागीरथीचे मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते. या मंदिरात गोदावरी आणि भागीरथीची स्वयंभू मूर्ती असून, सिंहस्थ कुंभपर्व काळातील तेरा महिन्यांच्या कालावधी व्यतिरिक्त सदर मंदिर कार्तिक शुद्ध पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा आणि गोदावरीच्या जन्मोत्सवाच्या वेळी ज्येष्ठ शुद्ध दशमीला एक दिवसासाठी खुले केले जाते. मात्र संपूर्ण वर्षभर सिंहस्थ काळातच मंदिरातील स्वयंभू गोदावरी-भागीरथीचे दर्शन भाविकांना घेता येते. बारा वर्षे बंद काळात बाहेर ठेवण्यात येणा-या चरणांची पूजा केली जाते. आता सिंहस्थ कुंभपर्वाची सांगता होण्यास अवघे तीन दिवस उरले असून, त्यानंतर मंदिराचे दरवाजे अर्थात कपाट बंद होणार आहे. गेल्या मंगळवारी २ आॅगस्टला गोदावरीला आलेल्या महापुरामुळे सदर मंदिरात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. गेले चार दिवस सदर मंदिर पूर्ण पाण्यात होते. गाळ काढण्याचे काम सुरू असल्याने सदर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे; परंतु तीन दिवसांनंतर ते बारा वर्षांसाठी बंद करण्यात येणार असल्याने भाविकांना दर्शनासाठी ते खुले करण्यासाठी मंदिराचे पुजारी प्रयत्न करत आहेत.