कल्याण : गणपती विसर्जनादरम्यान कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन डगळे यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याबाबतचा जो व्हिडीओ सध्या सर्वत्र प्रसारित झाला आहे, त्यामध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप जरीमरी सेवा मंडळाचे सचिव नाना सूर्यवंशी यांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. सूर्यवंशी म्हणाले की, मंगळवारी डगळे यांनीच एका घरगुती गणपती विसर्जनाच्या वेळी तलावाबाहेरील रिक्षाथांब्याजवळ वाजंत्री बंद करायला लावली. त्यानंतर, ढोल फोडले. त्यांना स्वयंसेवकांनी रोखले असता त्या स्वयंसेवकांना व ज्या घरातील तो गणपती होता, त्या व्यक्तीला शिवीगाळ करून दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर, त्यांनीच मुलांना तलावात खेचले. पाण्यात त्या मुलाची स्वत:चा जीव वाचवण्यासाठी त्यांच्याशी झटापट झाली असावी. उर्वरित ३ मुले ते दोघे पाण्यातून बाहेर आल्यानंतर त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडली होती. मात्र, त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले गेले. डगळे यांना बुडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा एक व्हिडीओ सध्या सर्वत्र फिरत आहे. मात्र, त्या व्हिडीओत काहीतरी छेडछाड करू न या प्रकरणाला वेगळे वळण देण्यात आले आहे, असा आरोप सूर्यवंशी यांनी केला. आमच्याकडील व्हिडीओमध्ये डगळे हे मुलांना मारताना आणि त्यांनीच त्या मुलांना पाण्यात ढकलल्याचे दिसते आहे.पोलिसांनी अटक केलेल्या त्या चारही मुलांना मंडळातर्फे कायदेशीर मदत दिली जाईल. तसेच मंगळवारच्या घटनेनंतर थांबवण्यात आलेले गणपती विसर्जन करण्याबाबत शुक्रवारी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. शिवसेनेचा पोलिसांना पाठिंबासध्या पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनेबाबत शिवसेना पोलिसांच्या पाठीशी आहे. समाजकंटक आणि कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी करणारे एक निवेदन गुरु वारी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यासह किशोर मानकामे, संतोष चव्हाण, प्रकाश तेलगोटे, श्रीराम मिराशी, हेमंत म्हात्रे, महिला पदाधिकारी स्मिता बाबर आदींनी डोंबिवली सहायक पोलीस आयुक्त सूर्यकांत घाडगे यांना दिले. अजून जनता पोलिसांबरोबर आहे. त्यामुळे पोलिसांमध्येही विश्वास निर्माण झाला आहे. जनता व पोलिसांनी एकत्र मिळून आता काम केले पाहिजे. यासाठी राजकीय मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे असे या वेळी घाडगे म्हणाले. पोलिसांवर बराच ताण असतो. अशावेळी जर नागरिक आणि पोलिसांत विश्वास असेल तर असे मारहाणीचे प्रसंग घडण्याचे प्रमाणही कमी होईल, असेही ते म्हणाले.
‘तो’ व्हिडीओ बनावट
By admin | Published: September 09, 2016 2:59 AM