ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 7 - लोणावळ्याजवळील कुलस्वामीनी एकविरा देवीच्या गड पायथ्याजवळील पुरातन मंदिरात रविवारी रात्री चोरी झाली. यामध्ये चोरट्यांनी मंदिराच्या लोखंडी दरवाज्यांचे कुलुप तोडत मंदिरातील दोन पैशांनी भरलेल्या दानपेट्या, देवीचा चांदीचा मुकुट व कानातील सुर्वणफुले असा अंदाजे सहा ते साडेसहा लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. सुदैवाने देवीच्या अंगावर फुलांचे हार असल्याने त्या हारांमधील सुमारे साडेअकरा तोळ्यांचा सोन्याचा हार चोरट्यांच्या नजरेत न आल्याने तो मात्र तसाच देवीच्या अंगावर राहिला.
देवीची पुजा अर्चा करणारे निखिल नाकवा हे पहाटे पाच वाजता मंदिरात आले असता त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले, त्यांनी गावचे माजी सरपंच गणपत पडवळ, सुरेश गायकवाड, मधुकर पडवळ आदींना याबाबत माहिती दिली. लोणावळा ग्रामीण पोलीसांना याबाबत माहिती कळवत परिसरात शोधाशोध केली असता एकाला मंदिरापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर डोंगराच्या कडेला दानपेट्या दिसल्या. चोरट्यांनी सदर पेट्यांचे लॉक तोडून आतमधील सर्व पैसे काढून घेऊन पेट्या येथेच सोडून पोबारा केला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.