ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - पायातील चप्पल काढून एअर इंडियाच्या कर्मचा-याला बेदम मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांचा उद्दामपणा कायम आहे. मी का माफी मागू ? मी माफी मागणार नाही, पहिली एअर इंडियाच्या कर्मचा-याने माफी मागावी मग पुढे पाहू असे रविंद्र गायकवाड यांनी सांगितले.
माझे विमानाचे तिकीट बुक आहे. मी आज एअर इंडियाच्या विमानाने जाणार आहे. ते मला ब्लॅक लिस्ट कस करतात ते बघूच ? माझा वकिल माझ्या प्रकरणाच पाहून घेईल असे खासदार रविंद्र गायकवाड यांनी सांगितले. रविंद्र गायकवाड आज 4.15 वाजता एअर इंडियाच्या विमानाने परतीचा प्रवास करणार आहेत.
एअर इंडियाने त्यांना ब्लॅक लिस्टच्या यादीत टाकले आहे तसेच रविंद्र गायकवाड यांच्यावर फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सने बंदी घातली आहे. या संघटनेमध्ये जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाईस जेट या विमान कंपन्यांचा समावेश आहे. यापुढे रविंद्र गायकवाडांना विमानात प्रवेश न देण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे.
रवींद्र गायकवाड संसदेच्या अधिवेशनासाठी सकाळी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला निघाले होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट होते. पण आपणास इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आल्याची त्यांची तक्रार होती. मात्र या विमानात बिझनेस क्लास नाही आणि केवळ इकॉनॉमी क्लासच आहे, याची कल्पना खा. गायकवाड यांच्या कार्यालयाला देण्यात आली होती.
विमानात आल्यानंतर आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. विमान दिल्लीला उतरल्यानंतर सर्व प्रवासी विमानातून खाली उतरले. मात्र खा. गायकवाड विमानातून खाली उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी खा. गायकवाड यांनी ६0 वर्षीय आर. सुकुमार या ड्युटी मॅनेजरला शिवीगाळ करीत सँडलने मारले.