ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - उरीमध्ये रविवारी भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये तीन जवान महाराष्ट्रातील आहेत. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे , शिपाई जानराव उईके आणि शिपाई संदीप सोमनाथ ठोक अशी या जवानांची नावे आहेत.
चंद्रकांत शंकर गलांडे साता-याच्या जासी गावचे आहेत तर, जानराव उईके अमरावतीच्य नांदगावचे आणि संदीप सोमनाथ ठोक नाशिकच्या खडांगळीचे आहेत. सिन्नर तालुक्यातील खडांगळी गावच्या संदीप यांची दोन महिन्यापूर्वीच उरी येथे बदली झाली होती. तीनही जवानांचे पार्थिव विशेष विमानाने दुपारी पुणे येथे येईल. तिथून पार्थिव मूळगावी नेण्यात येईल. काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून रविवारी आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले.
प्राणहानीच्या दृष्टीने अलीकडच्या काळातील लष्करी तळावरील हा सर्वांत भीषण हल्ला होता. चारही हल्लेखोर पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे होते व त्यांच्याकडे पाकिस्तानी शस्त्रे होती, असे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे.
दरम्यान या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी १५ लाखांची मदत जाहीर केली आहे.