ऑनलाइन लोकमत
त्र्यंबकेश्वर, दि. ७- श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असून, उद्याच्या पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेता तसेच पावसाची शक्यता गृहीत धरून त्र्यंबकेश्वर येथे नियोजन करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर येथे चारही सोमवारांबरोबरच संपूर्ण महिनाभर भाविकांचा ओघ राहणार असल्याने भाविक एसटी बस, खासगी वाहने अन्य प्रवासी बस आदिंचा वापर करून श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकला येत असतात. या गर्दीमुळे पोलीस यंत्रणेवर वाहनांचे नियोजन, कायदा आणि सुव्यवस्था राखणे आदि कामांसाठी सर्वात जास्त ताण येतो. हे सर्व करण्यासाठी जादा पोलीस बळ असावे लागते. सर्व खासगी वाहने खंबाळे, अंबोली, पहिने व तळवाडे वाहनतळावर थांबविण्यात येतील व तेथून बसने शहरात स्वतंत्रपणे एस.टी. बसने येता येईल.
गावात कुठलेही वाहन आणता येणार नाही, मात्र एसटी बस शहरात येतील हे नियोजन फक्त श्रावण सोमवारी असेल. बाकी जशी गर्दी वाढेल तसे नियोजन असेल, अशी माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली. परिक्रमा फेरी मार्गावरदेखील पुरेसा बंदोबस्त असेल. त्यामुळे केवळ हौसेखातर व फेरीच्या नावाखाली येणारे, नशिले, मादक पदार्थ सेवन करून 'पिकनिक'साठी व छेडछाड करणार्यांना चाप बसणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथे येणार्या भाविकांची आरोग्य व्यवस्था ग्रामीण रुग्णालयातर्फे घेण्यात येईल. पहिला, दुसरा आणि चौथ्या सोमवारी रुग्णालयात असलेल्या नियमित तीन वैद्यकीय अधिकारी-१, वैद्यकीय अधीक्षक-१ व अन्य कर्मचार्यांमार्फत व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध असेल तर तिसर्या सोमवारी मात्र चार ठिकाणी फिरते आरोग्य पथक तैनात करण्यात येईल. या शिवाय पाणीपुरवठा सुरळीतपणे होईल. त्र्यंबक नगरपालिका व मजीप्रातर्फे थोडा क्लोरिनचा डोस वाढविण्यात येईल.
पोलिसांची अधिक कुमक
त्र्यंबक पोलिसांनी पहिला, दुसरा आणि चौथ्या सोमवारी एक पोलीस उपअधीक्षक, १२ पोलीस निरीक्षक, २४ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ३00- पोलीस कर्मचारी, ७५ महिला पोलीस कर्मचारी, २00 पोलीस कर्मचारी, तर तिसर्या श्रावण सोमवारी चार पोलीस उपअधीक्षक, १६ पोलीस निरीक्षक, ६४ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ७00 पोलीस कर्मचारी, त्यात महिला पोलीस कर्मचारीदेखील असतील व ३00 होमगार्ड्सची मागणी केली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर, जव्हार फाट्यावरील बसस्थानक, सापगाव फाटा (जेथून फेरीचा परतीचा मार्ग आहे) व कुशावर्त तीर्थ या ठिकाणी फिरते आरोग्य पथक असेल. १0८ रुग्णवाहिका येथील दोन रुग्णवाहिकेसह नऊ रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे त्यामुळे कोणतीच गैरसोय होणार नाही. जादा वैद्यकीय कर्मचार्यांसह पुरेसा औषधसाठा, रुग्णालयात अँडमिट करण्याची व्यवस्था असेल, अशी माहिती डॉ. भागवत लोंढे यांनी दिली.
एस.टी. महामंडळातर्फे तिसर्या सोमवारव्यतिरिक्त नेहमीच्या १५0 गाड्यांव्यतिरिक्त ५0 जादा बसेस रविवार, सोमवार या दोन दिवसांत सोडण्यात येतील. तात्पुरत्या स्वरूपात जव्हार फाट्यावरील बसस्थानक सुरू करण्यात येत आहे.