ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 27 - "सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठाय हो, सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो," अशा परखड शब्दांत समाजातील आर्थिक विषमतेवर आसूड ओढणारे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. वेदनेचे महाकवी म्हणून उभ्या महाराष्ट्राला ठावुक असलेल्या वामनदादांच्या कुटुंबीयांवर ही वेळ आली आहे. आयुष्यभर वेदनामुक्तीचे गाणे गाणाऱ्या वामनदादांच्या परिवारावरच आज उपासमारी आणि बेघर होण्याची वेळ आलेली आहे. वामनदादांची हलाखीची परिस्थिती पाहून तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात दादांना सदनिका देण्याची घोषणा केली होती. सदनिकेचा ताबा घेण्याच्या दहा दिवस आधीच दुर्दैवाने वामनदादांचे निधन झाले. या घटनेला आज 12 वर्षे झाली तरी त्या मंजूर सदनिकेचा ताबा वारसांना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे 'आमच्या सदनिकेचा ताबा कुठाय हो,' असा सवाल विचारण्याची वेळ कर्डक परिवारावर आली आहे.