ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 22 - उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. अनेकांनी पर्यटनस्थळासोबतच बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहे. आरक्षण सुद्धा फुल्ल झाले आहे. त्यामुळे रेल्वेगाडीमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. जागा मिळविण्यासाठी अक्षरश: प्रवाशी जीवाशी खेळ करीत असल्याचे चित्र अकोला रेल्वे स्थानकावर दिसून येत आहे.
अकोला रेल्वे मार्ग हा मुंबईकडे व कोलकाताकडे प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून दररोज शेकडो रेल्वेगाड्या धावतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. त्यात आरक्षण मिळत नसल्याने, प्रवाशांना रेल्वे डब्यामध्ये जागा मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आली. रेल्वेगाडी येताना दिसताच, शेकडो प्रवाशी प्लॅटफॉर्मवरून उतरून रेल्वे रूळ ओलांडतात आणि पलिकडून उभे राहतात. रेल्वेगाडी येताच प्रवाशी जागा मिळविण्यासाठी गर्दी करताना दिसुन येतात. जागा मिळविण्यासाठी प्रवाशी जीव धोक्यात घालुन रूळ ओलांडतात. रूळ ओलांडताना, पलिकडच्या रूळावर दुसरी रेल्वेगाडी आल्यास, शेकडो प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रवाशी स्वत:चा जीव धोक्यात घालत असताना, रेल्वे प्रशासन मात्र याकडे र्दुलक्ष करीत आहे. रेल्वे रूळ ओलांडणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु रेल्वे स्थानकावर दररोज शेकडो प्रवाशी हा गुन्हा करताना दिसुन येतात. महिला, पुरूष लहान मुलांना घेवून जागा मिळविण्यासाठी अक्षरश: आपल्या जीवाशी खेळ करताना दिसुन येत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रेल्वे पोलीसांची बघ्याची भूमिका-
अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांसोबतच, रेल्वे सुरक्षा बलाचे सुद्धा कर्मचारी, अधिकारी तैनात असतात. प्रवाशी रेल्वेगाडी येत असताना, रेल्वेचा रूळ ओलांडत असल्याचे रेल्वे पोलिसांना दिसत असल्यानंतरही त्यांच्याकडून प्रवाशांविरूद्ध कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. एवढेच नाहीतर रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्यवसाय करणारे किरकोळ विक्रेते सुद्धा प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे रूळाचाच वापर करतात. परंतु त्यांच्याविरूद्धही पोलीस कारवाई करीत नाही.
https://www.dailymotion.com/video/x844zc3