ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २२ : जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या भारतीय जवानांना अकोला युवक मित्र मंडळाच्या वतीने गुरुवारी कँडल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाराणा प्रताप बाग ते मदनलाल धिंग्रा चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये सहभागी झालेल्या युवकांनी काळ्या फिती बांधून पाकिस्तानचा निषेधही केला.
उरी येथील लष्करी तळावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी रविवारी पहाटे केलेल्या भ्याड हल्ल्यात १८ भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानचा निषेध केल्या जात आहे. अकोल्यातील युवकांनी गुरुवारी एकत्र येऊन या हल्ल्याचा निषेध करतानाच भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. सायंकाळी ७.३० वाजता महाराणा प्रताप बाग येथून जवळपास दोनशे ते अडीचशे तरुण हातांमध्ये मेणबत्त्या घेऊन निघाले.
अत्यंत शांतपणे निघालेला हा कँडल मार्च मदनलाल धिंग्रा चौकात पोहोचला. तेथे या तरुणांनी मेणबत्ती ठेवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर माजी सैनिकांनी युवकांना संबोधित केले. राष्ट्रगीताने या मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.