ऑनलाइन लोकमत
त्र्यंबकेश्वर, दि. २२ - येथे आज तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त ‘बम बम भोले’ च्या जयघोषात भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली तर त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली आहे.
रविवारी रात्री बारा वाजल्यानंतर भाविकांनी ब्रह्मगिरी फेरीला प्रारंभ केला. त्यामुळे रविवारी रात्री त्र्यंबककडे येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला होता. तिसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत हजारो शिवभक्त त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या डोंगराला प्रदक्षिणा घालण्यासाठी रवाना झाले होते. यासाठी महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते.
मेळा स्थानकातून २६० बसेस तसेच नाशिकरोडवरून ३५ निमाणी वरून तीस, सातपूरवरून वीस, सिडको, पहिने, अंबोली येथून प्रत्येकी पाच, घोटीवरून दहा, खंबाळेवरून तीस अशा एकूण ४०५ बसेस त्र्यंबक वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या श्रावण सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. पोलिसांनी या परिसरातील रस्ते बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. त्यामुळे स्थानिकांचीही कोंडी झाली आहे. पोलीस प्रशासनाच्या नियोजनावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी दिवसभर त्र्यंबकसाठी धावणाऱ्या बसेसला गर्दी नव्हती. मात्र मध्यरात्रीनंतर ब्रह्मगिरी फेरीसाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी वाढली होती.