ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ७ - मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरु झाली असून 'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूनेही परीक्षेला हजेरी लावली. रिंकू दहावीची परीक्षा देण्यासाठी अकलुजच्या जिजामाता कन्या प्रशालेतील केंद्रावर हजर झाली. यावेळी केंद्र प्रमुख मंजुषा जैन यांनी रिंकूचे स्वागत केले.
सैराट सिनेमामुळे मिळालेल्या प्रचंड प्रसिद्धीमुळे रिंकूला शाळा सोडावी लागली होती. 'सैराट'च्या यशामुळे तिला शाळेत जाणेही अवघड झालं होतं. त्यामुळे घरी अभ्यास करुन बाहेर परीक्षा देण्याचा निर्णय तिने घेतला होता. नववीत तिला ८४ टक्के गुण मिळाले होते. 'सैराट'च्या कन्नड रिमेक 'मनसु मल्लिगे'मध्ये रिंकूने मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर मागील दोन महिन्यांत तिने दहावीचा पूर्ण अभ्यासक्रम संपवला. आता दहावीतही रिंकू चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांनी करायला हरकत नाही.
व्यग्रतेमुळे शाळेत जायला नव्हता वेळ
कामात व्यग्र असल्याने शाळेत जायला रिंकूकडे वेल नव्हता. त्यामुळे तिने १७ नंबरचा फॉर्म भरला. दहावीला शाळेत न जाता रिंकू बाहेरून परीक्षा देत आहे. काही दिवसांपूर्वी आर्ची शाळेत मर्सिडीजने गेल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. सैराटमधून पदार्पण करणा-या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु या जोडीने संपूर्ण महाराष्ट्रावर एकच गारुड केले. सैराट प्रदर्शित होऊन आता चार-पाच महिने झाले तरी, अजूनही प्रेक्षकांवरुन या चित्रपटाची मोहिनी कमी झालेली नाही. आजही रिंकू एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळते.
https://www.dailymotion.com/video/x844tpd