नीलिमा शिंगणे-जगड/ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 25 - पोलीस मुख्यालयासमोरील कमला नेहरू वस्ती. वस्तीमध्ये एक खोलीचं घर. येथील मजुरी करणाऱ्या दाम्पत्याला तीन मुलं. तिघांनाही खेळाची आवड़ मधल्याला राष्ट्रीय खेळ हॉकीचं वेड़ या वेडापायीच आणि असिमित मेहनत व सरावामुळे त्याने साई (भारतीय खेळ प्राधिकरण) मध्ये प्रवेश मिळविला आहे. अमित संतोष तायडे असे या होतकरू अकरा वर्षीय मुलाचं नाव आहे.गरिबीशी संघर्ष करीत तायडे दाम्पत्य तीन मुलांचा सांभाळ करीत आहेत. थोरला अंकित याला क्रिकेटचं वेड आहे. मधला अमित हॉकीवर प्रेम करतो. तर धाकटी प्राचीला खेळात रुची असूनही जवळपास मुलींकरिता खेळ मैदान नसल्याने कुठे जाऊ शकत नाही. अमित स्वावलंबी विद्यालयाचा विद्यार्थी. इयत्ता चौथीत असताना प्रशिक्षक धीरज चव्हाण यांच्याशी भेट झाली. चव्हाण यांनी अमितमधील गुण हेरू न त्याला हॉकीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पोलीस मुख्यालय हॉकी मैदान येथे अमितचे प्रशिक्षण सुरू झाले. सलग तीन वर्षांपासून अमित सकाळी ६ ते ९ आणि दुपारी ४ ते सायंकाळ ७ वाजेपर्यंत हॉकीचा सराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात करतो. मुख्यालयाचे मैदान एखाद्या वेळी उपलब्ध नसल्यास मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मैदानावर जाऊन सराव करतो; मात्र सरावात खंड पडू देत नाही. यावर्षी अमितने जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत प्रेक्षणीय कामगिरी केली.अमितचे वडील संतोष हे शहरातील जुने बसस्थानकाजवळील छोट्या हॉटेलमध्ये मजुरी करतात. आई प्रमिला ही धुणे-भांडे घासण्याची काम करते. दोघेही शिक्षित नसले तरी दोघांनाही मुलांना उच्चशिक्षण द्यायचे आहे. यासाठी मुलांना कामावर पाठवित नाहीत; मात्र शाळेत नियमित पाठवितात. अमितची निवड साई प्रशिक्षण केंद्रात झाल्याचेही त्यांना चव्हाण यांनी सांगितल्यावर माहीत झाले. चव्हाण यांनीच अमितची जबाबदारी स्वीकारू न साई प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळविण्यासाठी धडपड केली. त्यांना साईचे प्रशिक्षक रवी दुपारे यांनी मदत केली. अमितला औरंगाबाद येथील साई प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळाला आहे. अमित अभ्यासातही हुशार आहे. सहाव्या वर्गाची परीक्षा त्याने यंदा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. अमितचे आता सातव्या वर्गापासूनचे शिक्षण व खेळ प्रशिक्षण साई प्रशिक्षण केंद्रातच नि:शुल्क पूर्ण होणार आहे. साईमध्ये मन लावून सराव करणार असून, एक दिवस भारतासाठी पदक मिळविणारच, अशा आत्मविश्वासाने अमितने लोकमतह्जवळ सांगितले.
VIDEO : असिमित मेहनतीने अमितने मिळविला ‘साई’त प्रवेश
By admin | Published: June 25, 2017 2:39 PM
नीलिमा शिंगणे-जगड/ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 25 - पोलीस मुख्यालयासमोरील कमला नेहरू वस्ती. वस्तीमध्ये एक खोलीचं घर. येथील मजुरी ...
https://www.dailymotion.com/video/x8456if