ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 26 - ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल असलेल्या भारतात हस्तठशांच्या (फिंगर प्रिंटस) प्रणालीला अनोखे महत्त्व प्राप्त झाले आहे. जुळ्या मुलांमध्ये असलेल्या साम्यामुळे त्यामध्ये काही अडथळे येतात का हे शोधण्यासाठी पत्की हॉस्पिटल रिसर्च फाऊंडेशन व डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागातर्फे संशोधन करण्यात आले. त्या यशस्वी संशोधनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याची माहिती डॉ. सतीश पत्की यांनी रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे कोल्हापूरचे वैद्यकीय क्षेत्र पुन्हा एकदा देशपातळीवर अधोरेखित झाले आहे.
एकसारखे हस्त ठसे असतील तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून यावर लक्ष केंद्रित करून हे संशोधन करण्यात आले. याविषयी माहिती देताना डॉ. पत्की म्हणाले, सन २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यादरम्यान २८ जुळी मुले व एकसंचातील तिळी मुले दिसण्यास हुबेहूबसारखी आढळून आली. प्रत्येक जोडीमधील मुलांच्या रक्तगटाचा अभ्यास केला असता तो समान असल्याचे निदर्शनास आले. या सर्व जोड्यांतील मुलांना पुढच्या संशोधनासाठी आमंत्रित करण्यात आले व तेव्हापासून त्यांच्यामधील हस्तठशांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली तेव्हा असे आढळून आले की हुबेहूब जुळ्यांमध्ये दिसणे, रक्तगट व जनुकीय रचना तंतोतंत असली तरी त्यांच्या हस्तठशांमध्ये ४५ टक्क्यांहून जास्त फरक असतो. गर्भाशयातील वास्तव्यादरम्यान गर्भजलाच्या सूक्ष्म वातावरणातील तफावतींमुळे अशा जुळ्यांमधील प्रत्येक व्यक्तीचे ठसे हे वेगळे व स्वतंत्र निर्माण होतात. त्यामुळे बायोमेट्रीक व्यक्ती ओळखण्यामध्ये फसगत होत नाही. या वैशिष्ट्यामुळे संशोधनाचे निष्कर्ष हे बायोमेट्रीक व सरकारी धोरणे व कॅशलेस युगातील ‘भीम’ अॅप या सर्वांशी पूरक आहेत. या संशोधनाची दखल राष्ट्रीय स्तरावरील ‘नॅशनल जर्नल आॅफ क्लिनिकल अॅनॉटॉमी’ या वैद्यकीय क्षेत्रातील नियतकालिकाने घेतली आहे. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागातील डॉ. अनिता गुणे, डॉ. आनंद पोटे यांच्यासह डॅ.उज्ज्वला पत्की उपस्थित होत्या.
विविध क्षेत्रांतील वैद्यकीय तज्ज्ञांनी एकत्र येऊन केलेल्या व एकाच हॉस्पिटलमध्ये जन्म झालेल्या हुबेहूब जुळ्यांच्या तुलनात्मक हस्तठशांच्या संशोधनास राष्ट्रीय मान्यता मिळण्याची ही देशांतर्गत पहिलीच घटना असून यामुळे कोल्हापूरचे नाव वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे डॉ. पत्की यांनी सांगितले.
यानिमित्ताने आयोजित स्नेहमेळाव्यास तीस जुळी व तिळी अशा एकूण ६३ व त्यादेखील दोन वर्षे ते २९ वर्षाच्या व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. हुबेहूबसारखी दिसणारी तसेच एकमेकांसारखी वेशभूषा केलेली जुळी व तिळी बालके तसेच तरुण-तरुणींमुळे समारंभाचे वातावरण मंतरल्यासारखे झाले होते. उपस्थितांनी एखाद्या चित्रपटातील दृश्यालाही मागे टाकेल अशी वस्तुस्थिती अनुभवली.
https://www.dailymotion.com/video/x844swi