ऑनलाइन लोकमत
लासलगाव, दि. 1 - आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेलेले शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. गुरुवारी सकाळी राज्याच्या विविध भागात शेतमालाचे नुकसान करण्यात आल्याच्या घटना घडल्या. शेतमाल शहरांपर्यंत पोहचू नये यासाठी आंदोलकांनी दूध आणि भाजीपाला रस्त्यावर ओतून दिला. निफाड तालुक्यातील टाकळी फाटा येथील संतप्त शेतकऱ्यांनी निफाड चांदवड मनमाड त्रिफुली येथे आज पहाटे तीन वाजता नांदगाव वरून नाशिककडे जाणाऱ्या दुधाच्या पिशव्या असलेल्या गाडया अडवून ७०० ते ८०० लिटर दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकल्या.
नाशिकच्या लासलगाव जवळील औरंगाबाद हमरस्त्यावर काल रात्री साडेबारा वाजता एका दुधाच्या टॅकरमधून दुध खाली करीत असताना एमएच 15 ए ए 3061 या लासलगाव पोलिसांच्या जीपवर दगडफेक झाली. यावेळी पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणण्यासाठी बळाचा वापर करीत 21 पैकी आठ जणांना ताब्यात घेऊन निफाड येथील पोलीस कोठडीत ठेवले आहे.याबाबत रात्री उशीरा माहिती समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे हे सहकारी कर्मचारी चालक आव्हाड यांच्या घटनास्थळी दाखल झाले.
परंतु जमाव हिंसक झाला व पोलिसांच्या गाडीची काच फोडली.तातडीने निफाडचे पोलीस उपअधीक्षक दिपक गिर्हे व निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे व सायखेडा पोलिस कार्यालयाचे पोलीस सहाय्यक निरीक्षक मोरे हे घटनास्थळी दाखल झाले व 18 मोटारसायकल जप्त करून पोलिस स्टेशनमध्ये नेल्या.
याप्रकरणी दंगलीसह सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भाजीपाला व दुधाचे टॅकर्स अडवून नुकसान करीत असताना सचिन रामनाथ वावधाने , प्रभाकर गणपत वावधाने , निलेश भास्करराव उफाडे, संजय शिवराम निलख ज्ञानेश्वर अंबादास वावधाने, राहुल वावधाने, चिव्या संभेराव, पप्पू वावधाने , बाबजी वावधाने , मोतीराम संभेराव , समाधान वावधाने, गणेश वावधाने, भाऊसाहेब वावधाने , दिनकर संभेराव .,विलास वावधाने , बाजीराव वावधाने , वावधाने पहीलवान या आठ जणांना ताब्यात घेतले आहे.