अंबरनाथ : अंबरनाथचे शिवसेना नगरसेवक आणि जळगावचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश गुंजाळ यांच्या हत्येतील आरोपींचे फोटो वापरून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात वापरलेल्या शब्दांमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी गुंजाळ यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे या हत्येतील एका आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. गुंजाळ यांची हत्या २५ डिसेंबर २०१५ रोजी मोरिवली गावात झाली. या प्रकरणातील १२ आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईही झाली. त्यातील पाच आरोपी फरार होते. मात्र, पोलिसांनी या आरोपींवरील मोक्का रद्द केल्यामुळे गुंजाळ कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती. फरार आरोपींपैकी जगदीश थेटे मोरिवली गावात आल्याची माहिती पोलिसांना मिळताच अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेले असता, थेटेने न्यायालयाने दिलेल्या अटकपूर्व जामिनाची प्रत दाखवली. त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. थेटेला न्यायालयाने ७ जूनपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे आरोपीच्या समर्थकांनी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यात आरोपींचे फोटो वापरत गाणे तयार केले आहे. त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिसांनी सायबर क्राइमकडे दिली आहे, तसेच तो व्हिडीओ काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अटकपूर्व जामिनाविषयी पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज म्हणाले की, ‘या आरोपींचे जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार आहोत.’
गुंजाळ हत्येतील आरोपींचा व्हिडीओ व्हायरल
By admin | Published: June 02, 2016 3:07 AM