- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3 - ढोल-ताशा वादनातील युवकांची मक्तेदारी युवतींनी मोडून काढली आहे. पुण्यातील बहुतांश ढोल-ताशा पथकांत युवतींचा आवाज घुमत आहे. ढोल-ताशा वादनाची हौस आणि सळसळता उत्साह तरुणींना या क्षेत्राकडे खेचून घेत आहे. गणेश मंडळासह मिरवणुकांमध्ये उत्कृष्ट सादरीकरणासाठी युवती वाहवा मिळवित आहेत.
पुण्यातील सुमारे १५० पथकांमध्ये चार हजार युवतींचा यात समावेश आहे. साधारणत: १५ ते ३५ वयोगटातील तरुणींचा या पथकांमध्ये सहभाग आहे. ढोल वाजविणे तसे कष्टाचे काम. यासाठी प्रचंड एनर्जी आणि स्टॅमिना लागतो. त्यामुळे प्रॅक्टीसला येताना जड अन्न खाऊन चालत नाही. ढोल डोक्यावर घेऊन तीन फेºया मारूनच प्रॅक्टीसला सुरूवात होते.
तरुणींचे कौशल्य व प्रतिभेला वाव मिळावा, यासाठी समर्थ प्रतिष्ठान, आदर्श स्त्रीशक्ती प्रतिष्ठान आणि रमणबाग युवा मंचाने महिलांचे वेगळे पथक स्थापन केले. ढोल-ताशासह ढाल-तलवार, लेझीम याची प्रात्यक्षिके मुली सादर करतात.
महिलांनी वादन हे सुरक्षेच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक असले, तरी युवती निर्भीडपणे याला सामोरे जातात. ओळखपत्र आणि वारंवार त्यांच्या सुरक्षेची दक्षता पथकामार्फत घेतली जाते,ह्यह्य असे शिरीष थिटे व केतन कंक यांनी सांगितले.
ढोल-ताशा हा आपल्या संस्कृती व परंपरेचा भाग आहे. त्यामुळे मी वादनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. पारंपरिक वेशभूषेत आणि तालाच्या नादावर ठेका धरताना प्रत्येकजण वेगळ्याच विश्वात संचार करतो. युवतींनी या क्षेत्राचा एकदातरी अनुभव घ्यावा. सुरक्षेच्या दृष्टीने कधीकधी अडचणी येतात. पण, त्यातून मार्ग काढणे आपल्यावर अवलंबून असते,असे वादक पल्लवी थोरवे हिने सांगितले.