किशोर मापारी/ऑनलाइन लोकमत
लोणार, दि. 6 - जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी देश-विदेशातील येणारे पर्यटक भकास होत चाललेल्या वास्तू बघून व येथील असुविधा पाहून निराश होत आहेत. यामुळे पर्यटन वाढीला खीळ बसली आहे. २००२ मध्ये जागतिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर मंजूर झालेल्या २४० कोटी निधीचा वापर विकास कामापेक्षा बैठकांवरच खर्च होत असताना समस्या मात्र सुटताना दिसत नाही.
लोणार सरोवराला २००२ मध्ये जागतिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर २००४ मध्ये लोणार सरोवर परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला. जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवरचे महत्व जाणून तत्कालीन सरकारने यांनी २००६ मध्ये विकास कामासाठी २४० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र या निधीचा वापर विकास कामापेक्षा बैठकावरच खर्च होत असताना समस्या मात्र सुटताना दिसत नाही. अगदी सुरवातीचा पिसाळ बाभूळ काढणे हा मुद्दा अजूनही तसाच प्रलंबित आहे. सरोवरामध्ये घाण पाणी जाऊ नये, यासाठी निरीचा प्रकल्प तयार करून कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा काही फायदा झालेला नाही. तसेच सरोवर परिसराला तार कुंपण करण्यात आले पण कुंपनाणेच शेत खाल्ले, अशी गत झालेली आहे. सरोवर परिसरात असलेल्या अतिप्राचीन ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे पुरातत्व खाते कडून पाहिजे त्या प्रमाणत होऊ न शकल्यामुळे त्यांची पडझड होऊ लागली आहे. अहिल्याबाई होळकर अन्नछत्र, दैत्यसुदन मंदिर, शहर परिसरातील राष्ट्रीय स्मारकांना वसाहतीचा विळखा बसत असल्यामुळे त्या वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत .
लोणार हे एक पौराणिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. लोणार गावाचा उल्लेख पदम पुराण, स्कंद पुरान व विरज महात्म्य मध्ये केलेला आहे. लोणार पूर्वी विरज तीर्थ तथा विष्णु गया म्हणून ओळखले जायचे. लोणार येथे ३२ मंदिर, १७ स्मारक, १३ कुंड, ४ पाण्याचे प्रवाह आहेत. यापैकी २७ मंदिर, ०३ स्मारक, ०७ कुंड, ०४ पाण्याचे प्रवाह लोणार सरोवराच्या कडावर व मध्ये आहेत. यादव काळातील काही मुख्य बाजारपेठेच्या शहरामध्ये लोणार शहराचे सुद्धा नाव होते. ऐन अकबरी पुस्तकामध्ये मुगल बादशहा अकबराला लोणार येथे तयार होणारे साबण पुरविले जायचे असा उल्लेख आहे. मीठ, काच, बिबासाठी लोणार बाजारपेठ प्रसिद्ध होती. जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी देश-विदेशातील येणारे पर्यटक भकास होत चालेल्या ह्या वास्तू बघून व येथे मिळत असलेल्या असुविधांमुळे निराश होत असून यामुळे पर्यटन वाढीला खीळ बसली आहे.
"दैत्यसुदन मंदिर व धारतीर्थ स्थळी पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. याठिकाणी पुरातत्व विभागाने विशेष सुविधा पुरातत्व विभागाने पुरवून लोणार परिसरातील जीर्ण मंदिराची पुर्नस्थापना करावी," असे मत प्रा .गजानन खरात,लोणार सरोवर जतन व संवर्धन समिती, लोणार य़ांनी मांडले.
तसेच लोणारचे नगराध्यक्ष भूषण मापारी याबाबत म्हणाले, "राज्य पर्यटन मंत्री जयकुमारजी रावल यांची भेट घेऊन लोणार सरोवर येथील समस्या वर चर्चा करत विकास कामासाठी केवळ बैठका न घेता पर्यटन दृष्टीने विकासात्मक कामे करण्याची गरज असून जलद गतीने विकासात्मक कृती करण्याबाबत लक्ष वेधले आहे."
येथील ऐतिहासिक वास्तूंच्या दुरवस्थेबाबत इतिहास संशोधक प्रा. डॉ. सुरेश मापारी म्हणतात, "चालुक्य, यादव, मोगल काळातही लोणारला महत्व होते. संपूर्ण लोणार तालुक्याला ऐतिहासिक, धार्मीक, पौराणिक, वैज्ञानिक वैभवशाली महत्व लाभलेले आहे. यामुळे जागतिक अभ्यास केंद्र म्हणून लोणार सरोवर ची एक नवी ओळख निर्माण होत आहे."
https://www.dailymotion.com/video/x844nha