ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ५ - वाढते प्रदूषणामुळे श्वास घ्यायला शुद्ध हवा सुद्धा मिळत नाही, हे वास्तव आता शहरांसह ग्रामिण भागातही पाहयावयास मिळत आहे त्यामुळे शुद्ध हवेसाठी आता जंगलातच जावे लागेल पण जंगलही कुठे उरली आहेत? असे एक ना अनेक प्रश्न उभे ठाकतात. या प्रश्नावंर अकोल्यातील प्रभात किडस् या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तर शोधले. येथील शिक्षकांच्या मदतीने त्यांनी चक्क ऑक्सीजन देणारा ऑक्सी पार्कच निर्माण केल्यामुळे शुद्ध हवा मिळविण्याचा नवा मार्ग मिळाला आहे.
काय आहे ऑक्सी पार्क?
शाळेच्या सभागृहाला लागुनच असलेल्या दहा बाय ५० फुट आकाराच्या परिसरात विविध झाले लावली आहेत. या झांडाची निवड करतांना अशीच झाडे निवडलीत की ज्यामधून २४ तास ऑक्सीजनच निर्माण होईल. तुमच्या आमच्या अंगणातील तुळशी सोबतच स्रेक ट्री व अनेक शाभेच्या झाडांचे वनस्पतीशास्त्रीय महत्व ओळखून येथे लागवड करण्यात आली. त्या झाडांचे महत्व सांगणारे फलकही बोलके आहेत.
केवळ झाडेच लावली नाहीत या झाडांमुळे या परिसरातील तापमानात किती फरक पडतो, प्रदूषणाची पातळी किती याचेही मोजमाप येथे केले जाते. ऑक्सी पार्कच्या बाहेरचे वातावरण व ऑक्सीपार्कमधील वातावरण यामध्ये कमालीचा फरक व प्रसन्नता आढळून येत असल्याने शाळेतील प्रत्येक वर्गाची एक तासीका या आॅक्सी पार्क मध्ये होते. चला येथील एका विद्यार्थ्याकडूनच जाणून घेऊ या ! कसा आहे हा ऑक्सी पार्क.