सातारा - सातारा लोकसभा खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसलेंनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत अंतर्गत विरोध असतानाही शरद पवारांनीउदयनराजे भोसले यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिकीट दिलं. दरवेळीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीत विजय मिळविला. मात्र अवघ्या काही महिन्यातच उदयनराजेंनी राष्ट्रवादीची साथ सोडली.
उदयनराजेंचा भाजपा प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का होता. राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सातारा दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यात शक्तिप्रदर्शन करत पवारांचे जंगी स्वागत केले. हजारोंच्या संख्येने शरद पवारांची रॅली साताऱ्याच्या रस्त्यावरुन सभास्थळी जात होती. यावेळी कोण आला रे कोण आला, मोदी शहाचा बाप आला अशा घोषणाबाजींनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
सध्या सोशल मीडियात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रविवारी साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी शरद पवारांनी उदयनराजेंवर जोरदार टीकाही केली. दिल्ली भेटीवेळी स्वाभिमानाची वागणूक मिळाली नाही, म्हणून मोघलांच्या दरबारातून बाहेर पडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आता दिल्ली दरबारात मुजरा घालत आहेत. १५ वर्षे सत्तेत असताना यांनी काय केलं?’ असा सवाल करत ‘तुमचं हे वागणं बरं नव्हं,’ अशा शब्दांत पवारांनी उदयनराजेंवर निशाणा साधला. दिल्ली दरबारात लाचारी पत्करणाऱ्यांना जनताच आता जागा दाखवेल, असेही पवार म्हणाले होते.
मी शरद पवार... आम्ही साहेबांसोबतच..!राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ग्रामीण भागातील तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. शरद पवार यांचे आगमन होण्यापूर्वी उपस्थित मान्यवर कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली. मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी मी शरद पवार..आम्ही साहेबांसोबत असे लिहिलेल्या गांधी टोप्या परिधान केल्या होत्या.
राष्ट्रवादीच्या गीतावर थिरकले कार्यकर्तेराष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आगमन कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात केले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे गीत ध्वनिक्षेपकावर लावण्यात आले. या गाण्याच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला आणि उत्साही वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले.