मुंबई/परळी- राजकीय वाटचालीसह पक्षात होणारी घालमेल आणि गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल पक्षाला काय वाटतं, यासह विविध विषयावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी परळी मतदारसंघात झालेला पराभव आणि भविष्यातील वाटचाल, यावरही स्पष्ट भूमिका मांडली. लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी पंकजा मुंडे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
भाजपाने गोपीनाथ मुंडेंसाठी पाहिजे तेवढ न केल्यानं खटकतं का? पंकजा मुंडेंची 'मन की बात'
यावेळी त्यांना विचारण्यात आले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र होते. तसेच, अशी चर्चा होती की, भाजपचीही काही समीकरणे धनंजय मुंडे यांच्या बाजूने आहेत, त्यामुळेच तुमचा पराभव झाला का? यावर पंकजा म्हणाल्या, असं म्हणता येणार नाही. विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडे यांनी त्यांची ताकत वाढवली होती. आम्ही दोघे वेगळे लढलो असतो, तर आम्हाला हरवणे सोपी गोष्ट नसती. आमचे विचार वेगळे असले तरी, आमचे गुरू गोपीनाथ मुंडे आहेत.
यावेळी त्यांना विचारण्यात आले की, भविष्यात दोघे एकत्र आलेले दिसतील का? यावर त्या म्हणाल्या, आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षातून, वेगळ्या विचारधारेतून येतो, त्यामुळे आमच्या दोघांनाही एका बाजुला जाणे सोपे नाही. आता त्यांचा पक्ष आमच्याशी जोडला गेला आहे, त्यामुळे त्यांच्यासमोरही काही आव्हाने असणार आहेत. जी मते त्यांना सहज मिळणारी होती, ती आता त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे आमच्या दोघांच्या पक्षातील नेते काय ठरवतील, ते आता सांगणे कठीण आहे.
परळी मतदारसंघ सोडणार का? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी असा कुठलाही विचार करत नाही. तो मतदारसंघ माझ्यासाठी खुप भावनिक आहे. मुंडे साहेबांचा तो मतदारसंघ आहे. तिथूनच मी दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले, मुंडे साहेबांच्या काळात मी तिथे कामे केली आहेत. माझ्या कार्यकर्त्यांचा मोठा जमावडा आहे. मी पराभूत झाले पण 95 हजार मते घेऊन पराभूत झाले. ह्या 95 हजार लोकांना मी वाऱ्यावर सोडू नाही शकत.
"मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री"; पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सोबत आले आहेत, त्यामुळे पुढील विधानसभेत भाजपने परळी मतदारसंघ धनंजय मुंडे यांना सोडल्यावर तुमचा पवित्रा काय असेल? या प्रश्नावर पंकजा म्हणाल्या, मला वाटत नाह की, भाजप माझ्याशी चर्चा केल्याशिवाय असा निर्णय घेईल. भाजपचा असा स्वभाव, संस्कृती नाही. असा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी चर्चा नक्की करतील. सध्या माझ्याशी अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. परळीची जागा सोडायचा विषयच येत नाही. माझ्याशी किंवा धनंजयशी अशी कुठलीही चर्चा झालेली नाही, त्यामुळे अशी चर्चा झाल्यानंतर पाहू, अशी स्पष्टोकी पंकजा यांनी दिली.