ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 18 - राज्यभरात अतिवृष्टीमुळे विविध राष्ट्रीय महामार्गांना मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. यामुळे सरकारप्रती रोष वाढत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी संपूर्ण राज्याकरिता ९ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नागपूर मंडळाअंतर्गत येणा-या गडचिरोली, अकोला, नागपूर या तीन विभागीय कार्यालयांना प्रत्येकी एक-एक कोटी रूपयांचा निधी खड्डे बुजविण्यासाठी मिळणार आहे. गडचिरोली विभागीय कार्यालयाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली हे दोन जिल्हे येतात. या दोन जिल्ह्यात जवळजवळ एक हजार किमीपेक्षा अधिक राष्ट्रीय महामार्ग आहे. अतिवृष्टीने संपूर्ण महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून दिवाळीच्या तोंडावर खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गडचिरोली कार्यालयाकडे प्रस्तावित निधीची कवडीही आली नसताना कंत्राटदारांना तुमचे कामाचे पैसे त्वरित दिले जातील, तुम्ही आधी खड्डे बुजविण्याचे काम उधारीवर सुरू करा, अशी सूचना देऊन काम सुरू करून घेण्यात आले आहे. त्यामुळे गडचिरोली शहरवासीयांना राष्ट्रीय महामार्गांवरील खड्ड्यांपासून दिलासा मिळणार आहे. दिवाळीच्या तोंडावर गुरूवारपासून निधी उपलब्ध नसला तरी गडचिरोली शहरात धडाक्यात रस्ते दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे.