कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला सोमवारी करवीरनिवासिनी श्रीअंबाबाईची श्रीशैलपुत्रीमाता रूपात पूजा बांधण्यात आली. नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, लाला गायकवाड यांच्या हस्ते श्रीअंबाबाईचा अभिषेक झाला. दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची श्रीशैलपुत्रीमाता रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा नीलेश ठाणेकर, दिवाकर ठाणेकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली. जुना राजवाड्यातील श्रीतुळजाभवानी देवीची अश्वारूढ रूपात बांधण्यात आली.
अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोईसुविधांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. सुसज्ज स्वच्छतागृहांपासून ते चप्पल स्टँड, बॅगा ठेवण्यासाठी लॉकर्स, कोल्हापूरच्या पर्यटनाची माहिती देणारे केंद्र, पिण्याचे स्वच्छ पाणी, वैद्यकीय केंद्र, पोलीस नियंत्रण कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पार्किंग सुविधा या सगळ््यांचे सुयोग्य व्यवस्थापन केल्याने, भाविकांना कोणत्याही त्रासाविना अंबाबाईचे दर्शन घडत आहे.