ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - सहावीच्या मराठी भाषा पुस्तकात डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची चुकीची जन्मतारीख छापण्यात आल्याचं समोर आलं आहे. बृहन्मुंबई निम्नस्तर मराठी शिक्षक संघटना अभ्यास मंडळाकडून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. लोकमान्य टिळक इंग्लिश हायस्कूलमध्ये सहावीत शिकणा-या सोहम संदिप मोते या विद्यार्थ्याने निदर्शनास आणून दिल्यानंतर ही गोष्ट समोर आली. काँग्रेसने याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यंदा डॉ. आंबेडकरांचं 125 व्या रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं होत असताना त्यांची जन्मतारीख 14 एप्रिलऐवजी 4 एप्रिल प्रकाशित करुन विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न समिती करत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसने केला आहे. तर, शिवाजी महाराजांप्रमाणे बाबासाहेबांचा इतिहास बदलण्याचा डाव आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस विलास रुपवते यांनी केला.प्रकाशित आणि वितरित केलेली लाखो पुस्तकं रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसंच अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुमन कुबडे आणि त्यांच्या कार्यकारी मंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
घाटकोपरमधील पंतनगर पोलिस स्थानकात यासंबंधी निवेदन देण्यात आलं आहे. या मंडळावर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा मुंबई काँग्रेसने दिला आहे.