‘प्रेरणास्थळ’ येथे सूरमयी दिवाळी पहाट
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. १ - दिवाळीच्या आनंद पर्वात जर्मन कलावंत कर्स्टन विके यांच्या रुद्रवीणा वादनाने यवतमाळकर रसिकश्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘प्रेरणास्थळा’वरील प्रसन्न पहाटे वीणेतून झंकारलेले सूर थेट श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले. पखवाज वादक प्रबलनाथ यांनी तेवढ्याच ताकदीने कर्स्टन विके यांना साथसंगत केली.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रेरणास्थळावर मंगळवारी दिवाळी पहाट हा सूरमयी कार्यक्रम उत्साहात पार पडला. कास्टर्न विके यांनी आपल्या वादनाची सुरूवात राग तोडीने केली. धीरगंभीर स्वरांचा नाद वातावरण भारावून गेले. तब्बल दोन तास वैशिष्ट्यपूर्ण स्वरांचा मेळ श्रोत्यांना वेगळी आनंद अनुभूती देत होती. या मैफलीत पखवाज वादक प्रबलनाथ यांनी अतिशय समर्पक आणि ताकदीने साथसंगत केली. कार्यक्रमाची सांगता भैरवी रागातील धृपद रचनेने झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमत मीडिया प्रा.लि. च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी रुद्रवीणा वादक कर्स्टन विके आणि पखवाज वादक प्रबलनाथ यांचा सत्कार केला. यावेळी लोकमतचे चेअरमन देवेंद्र दर्डा, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.