मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अद्यापही एकाही पक्षाने सत्ता स्थापनेसाठी दावा केला नाही. महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढणाऱ्या शिवसेना-भाजपाला राज्यातील जनतेने बहुमत दिलं. मात्र दोन्ही पक्षाला अपेक्षित यश राज्यात मिळालं नाही. भाजपाला १६४ पैकी १०५ जागा मिळाल्या तर शिवसेनेला १२४ पैकी ५६ जागांवर समाधान मानावं लागलं.
मात्र भाजपाच्या जागा घटल्याचे दिसताच शिवसेनेनेही मुख्यमंत्रीपदावरुन भाजपावर दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत करत आहेत. त्यामुळे बहुमत असूनही शिवसेना-भाजपाला सत्ता स्थापन करता आली नाही.
शिवसेना-भाजपाचा इतिहास पाहिला तर २०१४ ची लोकसभा निवडणुका या दोन्ही पक्षाने एकत्र लढविल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेना भाजपाची २५ वर्षाची युती तुटली. मागील विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपाने वेगवेगळी लढली होती. पण शिवसेना आणि भाजपाने 2014 साली युती केली असती तर कदाचित उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१८ मध्ये ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार’ सोहळ्यात केलं होतं.
या कार्यक्रमात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, तेव्हा भाजपा शिवसेनेला १४७ जागा द्यायला तयार होती. आम्हाला १२७ जागा व मित्रपक्षांना इतर जागा, असे सूत्र ठरले होते. त्यामुळे शिवसेनेला १४७ पैकी १२० जागा जिंकता आल्या असत्या व उद्धवजी मुख्यमंत्री झाले असते. ते तयार झाले नसते तर आपणही मुख्यमंत्री होऊ शकला असतात, अशी मिष्किल टिप्पणीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली होती.
सध्या राजकीय घडामोडीत शिवसेनेकडून संजय राऊत एकटे खिंड लढविताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक भूमिका, भाजपाचा सडेतोड उत्तर, सामना अग्रलेखातून प्रहार अशा विविध भूमिकांमधून संजय राऊत भाजपावर निशाणा साधत आहेत. त्यामुळे युतीच्या राजकारणात संजय राऊत यांचे विधान आज सर्व माध्यमांसाठी महत्वाचं ठरत आहे.
पाहा व्हिडीओ
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार नाही कारण...
आमदार फुटण्याच्या भीतीने घडणार 'हे' समीकरण; पुढील ४८ तास महत्वाचे'
'होय, आमचं पवारांशी बोलणं झालं; मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार'
मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा?; फॉर्म्युला 95चाच, पण... नव्या चर्चेला जोर
'छ. शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असेल तर शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करा'
'ही तर बौद्धिक दिवाळखोरी; दरबारी राज्य चालवित असेल तर राजाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह'
...म्हणून मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावं तेवढे थोडेच; शिवसेनेने घेतली मवाळ भूमिका?