मुंबई : हैद्राबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत त्वरित अटक व्हावी, या प्रमुख मागणीसाठी जस्टिस फॉर रोहित जॉइंट अॅक्शन कमिटीच्या वतीने सोमवारी भायखळा राणीबाग ते विधानभवनापर्यंत प्रतिकार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चमध्ये सामाजिक, राजकीय आणि विद्यार्थी संघटना सहभागी होणार आहेत.रोहित वेमुलाच्या आत्महत्येला जबाबदार असणारे केंद्रीय मंत्री, हैद्राबाद विद्यापीठाचे कुलगुरु पी. आप्पा राव व मुख्य प्रॉक्टर प्राध्यापक आलोक पांडे, यांच्यासह अभाविपचे राज्य अध्यक्ष सुशील कुमार यांना एससी,एसटी अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत त्वरित अटक झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसह रोहितच्या केसमध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळा राणीबागपासून सकाळी ११ वाजता या मोर्चाला प्रारंभ होईल. या मोर्चाचे नेतृत्व भारिप नेते प्रकाश आंबेडकर करणार आहेत.या मोर्चामध्ये आयआयटी मुंबईचे विद्यार्थी, मुंबई विद्यापीठ, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, निर्मला निकेतन, सिद्धार्थ कॉलेज, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, रूपारेल कॉलेज, आंबेडकर कॉलेज, झेव्हियर्स कॉलेज आदी कॉलेजांमधील विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आयआयटी आणि मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी गेल्या आठवडाभरापासून या मोर्चाची जय्यत तयारी करत आहेत. विद्यार्थ्यांनी शहरातील विविध ठिकाणी पत्रके लावून या नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. (प्रतिनिधी)
रोहितच्या समर्थनार्थ विधान भवनावर मोर्चा
By admin | Published: February 01, 2016 2:47 AM