मुंबई - गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने आता विधान परिषदेतही मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या महिन्याअखेरीस रिक्त होत असलेल्या विधान परिषदेतील 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ पाचने वाढून भाजपा हा वरच्या सभागृहातील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. कार्यकाळ समाप्त होत असलेल्या 11 सभासदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, काँग्रेसचे तीन, भाजपाचे दोन आणि शिवसेना व शेकापचा प्रत्येकी एक सदस्य आहे. रिक्त झालेले सभासद विधानसभा सदस्यांकडून निवडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाचे पाच आणि शिवसेनेचे दोन सदस्य निवडून येऊ शकतात. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या तडजोडीनुसार काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीचा एक सदस्य निवडून येऊ शकतो. तर अन्य पक्षांनी अतिरिक्त उमेदवार न दिल्यास शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषद सदस्य जयंत पाटील हे सुद्धा आपली जागा राखू शकतील. सध्या विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 20, काँग्रेसचे 18, भाजपाचे 20 आणि शिवसेनेचे 11, शेकाप, जदयू, पीआरपी यांचे प्रत्येकी एक आणि सहा अपक्ष सदस्य आहेत. मात्र होऊ घातलेल्या निवडणुकीनंतर हे चित्र बदलणार असून, भाजपा अव्वलस्थानावर जाईल. दरम्यान निवडणूक प्रकिया आटोपून भाजपा अव्वल स्थानी पोहोचल्यावर भाजपाकडून सभापतीपदासाठी प्रयत्न केले जातील, असे भाजपाच्या एका नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.
Vidhan Parishad Election 2018: भाजपाला आणखी 'अच्छे दिन'; विधानसभेतील 'मोठा भाऊ' आता विधानपरिषदेतही होणार 'मोठा'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 6:31 PM