मुंबई - विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात अभिजित पानसेंना उमेदवारी देऊन प्रचारालाही सुरुवात करणाऱ्या मनसेने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघामधून अभिजित पानसे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत.
नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेनेभाजपा आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर मनसेने विधान परिषद निवडणुकीत महायुतीसोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या मतदारसंघात विद्यमान आमदार असलेल्या निरंजन डावखरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मात्र भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातून माघार घ्यावी, राज ठाकरे यांना विनंती केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, मनसेने विधान परिषदेची निवडणूक लढवू नये, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या विनंतीला मान देत राज ठाकरे यांनी मनसेचा उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाजपाचे विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांनी आज सकाळी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान, या निवडणुकीत मनसेने माघार घेतली असली तरं असं नेहमी होणार नाही, असे संकेतही नितीन सरदेसाई यांनी दिले आहेत.
दरम्यान, अभिजित पानसे यांच्या माघारीनंतर कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे, शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे आणि काँग्रेसचे रमेश कीर हे रिंगणार आहेत.