गेल्या आठवड्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीने मुसंडी मारत ९ जागांवर विजय मिळवला होता. तर विरोधा पक्षातील महाविकास आघाडीला केवळ २ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पुरस्कृत केलेले उमेदवार आणि शेकाप नेते जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. जयंत पाटील यांचा झालेला पराभव हा महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव नेमका का झाला याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोठं आणि सूचक विधान केलं आहे.
आज पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, जयंत पाटील यांच्याबाबत महाविकास आघाडमधील घटक पक्षांमध्ये एकत्रित निर्णय झाला नव्हता. मलाही इंट्रेस नव्हता. आमच्या पक्षाकडे सगळी मिळून १२ मतं होती. शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिला पाहिजे, असं आम्हाला वाटलं. त्याला एक कारण होतं. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. ती आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढली. मात्र महाविकास आघाडीमधील इतर लहान पक्षांनीही जागांची मागणी केली होती. तेव्हा आपण लोकसभा निवडणुकीत या पक्षांना जागा देऊ शकत नाही, मात्र विधान परिषद निवडणूक किंवा विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षांना सामावून घेऊ, असं मी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सांगितलं. ते सगळ्यांनी मान्य केलं. डाव्या पक्षांनीही मान्य केलं. मदग आम्ही तिघेही एकत्र लढलो आणि आम्हाला यशही चांगलं मिळालं , असं शरद पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, संधी आली तर डाव्या पक्षांचा विचार करायचा, हे माझ्या मनात होतं. त्यानुसार विधान परिषद निवडणुकीत मी आमच्या पक्षाकडे असलेली १२ मतं शेकापला देण्याचा निर्णय घेतला. तसेच याबाबत मित्रपक्षांनाही कळवलं. त्याचवेळी काँग्रेसकडे मतं अधिक होती. त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करणं साहजिकच होतं. शिवसेनेकडे मतं होती पण उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी नव्हती. मात्र त्यांनी आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निवडणुकीसाठी आखलेल्या रणनीतीमध्ये मतभिन्नता होती. माझं व्यक्तिगत मत वेगळं होतं. काँग्रेसने आपल्याकडील पहिल्या प्राधान्याची मतं इतर कुणालाही देऊ नये. तर दुसऱ्या प्राधान्याची अर्धी मतं शिवसेना आणि अर्धी मतं शेकापला द्यावीत. तसेच शिवसेनेनं आपली दुसऱ्या प्राधान्याची मतं शेकापला द्यावीत, असं माझं मत होतं. असं झालं असतं तर तिन्ही उमेदवार विजयी झालं असतं. मात्र हे गणित सगळ्यांनाच मान्य होईल, असं नव्हतं. ते मान्य झालं नाही. त्यामुळे अखेरीस जयंत पाटील यांचा पराभव झाला, असे शरद पवार यांनी सांगितले.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त रणनीती कशी असावी, यासंबंधीची मतभिन्नता होती, असं शरद पवार यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत अकराव्या जागेसाठी ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यात दुसऱ्या प्राधान्याच्या मतांमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली होती.