मुंबई - विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत दिलजमाई झाली. मात्र, महायुतीत शिंदेसेनेने माघार घेतली तरी दोन मतदारसंघांत अजित पवार गटाचे उमेदवार भाजप आणि शिंदेसेनेसमोर उभे ठाकले आहेत.
महायुती असतानाही विधान परिषद निवडणूक लढविणे हा रणनीतीचा भाग आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेनंतर शिक्षक मतदारसंघात आमचा उमेदवार कायम ठेवल्याचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई पदवीधरसाठी शिंदेसेनेने दीपक सावंत यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपच्या आग्रहामुळे शिंदेसेनेला माघार घ्यावी लागली. कोकण पदवीधरमध्येही भाजपचे निरंजन डावखरे यांच्यासाठी शिंदेसेनेच्या संजय मोरे यांनी माघार घेतली. अजित पवार गटाने मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघात अनुक्रमे शिवाजीराव नलावडे व महेंद्र भावसार यांची उमेदवारी कायम ठेवली.
ठाकरेंनी घेतला उमेदवार मागे- नाशिक शिक्षक व कोकण पदवीधरमधून उमेदवार मागे घेण्याची मागणी काँग्रेसनेउद्धव ठाकरेंकडे केली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यासाठी फोन केला, मात्र तो ठाकरेंनी न उचलल्याची तक्रार होती. - अखेरच्या दिवशी ठाकरेंकडून कोकण पदवीधरचे किशाेर जैन यांनी, तर शरद पवार गटाच्या अमित सरैयांनी उमेदवारी मागे घेतली. काँग्रेसनेही नाशिक पदवीधरमधून दिलीप पाटील व मुंबई शिक्षकमधून प्रकाश सोनवणेंची उमेदवारी मागे घेतली.
अशा होणार प्रमुख लढतीमुंबई पदवीधर : ॲड. अनिल परब (उद्धवसेना), किरण शेलार (भाजप)मुंबई शिक्षक : शिवाजी नलावडे (अजित पवार गट), ज. मो. अभ्यंकर (उद्धवसेना), शिवनाथ दराडे (भाजप), सुभाष मोरे (समाजवादी गणराज्य पक्ष) कोकण पदवीधर : निरंजन डावखरे (भाजप), रमेश कीर (काँग्रेस) नाशिक शिक्षक : संदीप गुळवे (उद्धवसेना), किशोर दराडे (शिंदेसेना), महेंद्र भावसार (अजित पवार गट)