विरार - राज्यसभेच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या १० जागांसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. येत्या २० जूनला विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपाकडून ५ आणि महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी उमेदवार आणि पक्षाच्या नेत्यांची धडपड सुरू आहे. यात अपक्ष, घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
राज्यसभा निकालात बहुजन विकास आघाडीची ३ मते निर्णायक ठरली. त्यानंतर आता पुन्हा विधान परिषदेत ही मते मिळावी यासाठी भाजपासोबत राष्ट्रवादीनेही प्रयत्न सुरू केले आहेत. २ दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर आता भाजपाचे नेते गिरीश महाजन आणि प्रविण दरेकर हे हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला विरारला पोहचले. गिरीश महाजन आणि प्रविण दरेकर यांनी चर्चगेटहून विरार लोकल पकडून ठाकूरांचे घर गाठले.
यावेळी प्रविण दरेकर, महाजन यांनी वाहनातून उतरताना त्यांची वाट पाहणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत दरेकरांचा प्रेमळ संवाद झाल्याचं पाहायला मिळालं. दरेकर गाडीतून उतरले अन् म्हणाले, "अप्पा, मी ऐकलं तुम्ही मला शिव्या दिल्या म्हणून मला यायला लागलं. प्रसाद बोलला, अप्पा बोलले प्रविण लय मोठा झाला का विरोधी पक्षनेता बनला तर." त्यावर प्रसादलाच मी घातल्या असं सांगत दरेकर, महाजन आणि हितेंद्र ठाकूर हे आतमध्ये गेले.
"२६ आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल"दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीत ११ पैकी १० जण निवडून येणार, एकाचा पराभव होणार हा चमत्कार घडणारच आहे. चमत्कार कुणाच्या बाजूने घडेल हे महाराष्ट्र सोमवारी बघेल. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल. मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असं विधान केले आहे.
शिवसेनेच्या समर्थक आमदारांना काँग्रेस-एनसीपी नेत्यांनी फोन केल्याच्या वादावरही अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. अजित पवार म्हणाले की, मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोललो. तुमचे ५६ आणि ४-५ जण मिळून ६० होतात. ३० -३० मते पडली तर इतर अपक्षांना सोबत घेण्याबाबत मी फोन केले. महाविकास आघाडी समर्थक अपक्षांना फोन केले. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांनीही सांगितले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी आपापल्या परीने तयारी करावी असं सांगितले. मतदानादिवशी मतांचा कोटा कसा असावा हे सांगतो असंही त्यांनी सांगितले. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मते घेतल्यानंतर तिसरा आणि चौथ्यासाठी एकत्र बसून ठरवू असं त्यांनी सांगितले.