मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली पण पसंतीची मत देताना दुसऱ्याची मदत घेतली म्हणून काँग्रेसने भाजपाच्या या दोन मतांवर आक्षेप घेतला. पण आता काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला असून काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याच दरम्यान प्रसाद लाड यांच्या विजयाबद्दल पैज लागली आहे.
भाजपाचे नेते प्रवीण दरेकर (BJP Pravin Darekar) आणि राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांच्यामध्ये प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या विजयाबद्दल पैज लागली आहे. प्रसाद लाड यांना ३२ मतं मिळतील असं म्हटलं आहे. दरेकरांनी स्वाक्षरी करून बनसोडे यांना एक कागद दिल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसनं असंवेदनशीलतेचा कळस गाठला अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काँग्रेसचे आरोप बेकायदेशीर असून परवानगी घेऊनच मतदान केल्याचं संजय कुंटे यांनी म्हटलं आहे.
भाजपाच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या अंथरूणाला खिळून असलेल्या आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेऊन काँग्रेसने बेशरमपणाच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. निवडणूक आयोग काँग्रेसच्या या निरर्थक आक्षेपाला दाद देणार नाही अशी अपेक्षा आहे असं भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी विधान परिषदेसाठी मतदान करू देण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. कोर्टानं दोघांनाही मतदान करण्याची परवानगी दिलेली नाही त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.