मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता येत्या २० जून रोजी विधान परिषद निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत १० जागांसाठी मतदान होईल परंतु ११ उमेदवार उभे राहिल्याने बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत भाजपाने ५ उमेदवार उभे केले आहेत. तर महाविकास आघाडीने ६ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीने एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे.
परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंना पाडण्यासाठी भाजपा पूर्ण ताकद लावणार असल्याचा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. इम्तियाज जलील म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांना पाडण्यासाठी संपूर्ण ताकद लावतील. खडसे यांना भाजपा आत आणि बाहेरून सगळी माहिती आहे. ते विधान परिषदेत आले तर भाजपासाठी अवघड होईल. म्हणून खडसेंना पराभूत करण्यासाठी भाजपा ताकद लावणार असल्याची माहिती असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच शरद पवार(Sharad Pawar) एकनाथ खडसेंना विधान परिषदेत निवडून आणतील का नाही हे पाहणं गरजेचे आहे असं जलील यांनी सांगितले. त्याचसोबत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना मत देण्याची माझी वैयक्तिक इच्छा आहे. १ मत हंडोरे यांना दिले पाहिजे. हंडोरे मंत्रिपदावर असताना दलित समाजासाठी खूप मोठं काम केले जे आजवर कुणी केले नाही. त्यामुळे हंडोरे निवडून यावेत अशी आमची इच्छा आहे. मुंबईला गेल्यावर आम्ही पक्षाच्या आमदारांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ अशी माहिती इम्तियाज जलील यांनी दिली.
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला टोला
आदित्य ठाकरे अयोध्येला जाऊ शकतात. त्यांचे श्रद्धास्थान आहे. परंतु धार्मिक स्थळी जाताना गाजावाजा करण्याची गरज काय? माध्यमांना घेऊन सगळी प्रसिद्धी नाटकं केली जात आहे. आदित्य ठाकरेंना हे करण्याची गरज आहे असं वाटत नाही असं सांगत खासदार इम्तियाज जलील यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं आहे.