मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला आहे. उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दुसरे ठाकरे ठरले आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या संपत्तीवरही खुलासा झाला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेतून निवडून जाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये शपथपत्रासोबत त्यांनी संपत्तीचे विवरण दिले आहे. यानुसार उद्धव ठाकरेंकडे जवळपास 125 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे.
उद्धव ठाकरेंकडे स्वत:चे वाहन नाही. मातोश्री आणि मातोश्रीच्या समोर निर्माणाधिन असलेली दोन घरे आणि कर्जतमध्ये एक फार्महाऊस आहे. उत्पन्नाचा स्रोत हा विविध कंपन्यांच्या शेअर्समधून येणारा डिव्हिडंट, भागीदारी असल्याचे म्हटले आहे. हे प्रतिज्ञापत्र अद्याप निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले नसून टीव्ही९ ला सुत्रांनी ही माहिती दिली आहे. याआधी आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीचे विवरण दिले होते. उद्धव ठाकरेंचे शपथपत्र काही तासांत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.
गुन्हे किती? उद्धव ठाकरेंवर पोलिसांमध्ये एकूण २३ प्रकरणे नोंद आहेत. यापैकी १२ प्रकरणे रद्द झाली असून अन्य प्रकरणे खासगी तक्रारी आहेत. केवळ एकच प्रकरण सध्या त्यांच्या नावावर आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सामना कार्यालयाबाहेर राडा झाला होता. त्याची नोंद ठाकरेंच्या नावावर आहे.
आदित्य ठाकरेंची संपत्ती किती? आदित्य ठाकरेंनी विधानसभा क्षेत्रात प्रचंड शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. आदित्य यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे. आदित्य यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार दागिने आणि २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड्स आहेत. याशिवाय आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारदेखील आहे. या कारची किंमत ६ लाख ५० हजार असल्याची माहिती आदित्य यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू
अजब! चंद्राचा तुकडा विक्रीला; किंमत करोडोंच्या घरात
CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय