मुंबई - विधान परिषद निवडणुकीत ११ पैकी १० जण निवडून येणार, एकाचा पराभव होणार हा चमत्कार घडणारच आहे. चमत्कार कुणाच्या बाजूने घडेल हे महाराष्ट्र सोमवारी बघेल. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल. मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले.
शिवसेनेच्या समर्थक आमदारांना काँग्रेस-एनसीपी नेत्यांनी फोन केल्याच्या वादावरही अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. अजित पवार म्हणाले की, मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोललो. तुमचे ५६ आणि ४-५ जण मिळून ६० होतात. ३० -३० मते पडली तर इतर अपक्षांना सोबत घेण्याबाबत मी फोन केले. महाविकास आघाडी समर्थक अपक्षांना फोन केले. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांनीही सांगितले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी आपापल्या परीने तयारी करावी असं सांगितले. मतदानादिवशी मतांचा कोटा कसा असावा हे सांगतो असंही त्यांनी सांगितले. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मते घेतल्यानंतर तिसरा आणि चौथ्यासाठी एकत्र बसून ठरवू असं त्यांनी सांगितले.
अपक्षांना राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी रणनीती; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले
तसेच आम्हाला दुसरा निवडून आणण्यासाठी थोड्या मतांची गरज आहे. आजपर्यंत आम्ही काम केले आहे. महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील याकडे मुख्यमंत्र्याचा कल आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मत मांडले आहे. मतांचा कोटा जास्त कसा ठेवता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे. आमदारांवर दबाव असल्याचं आतापर्यंत एकाही आमदाराने मला सांगितले नाही असं सांगत अजित पवारांनी नाना पटोलेंच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नाना पटोले?केंद्रातील भाजपा सरकार सीबीआय आणि ईडीचा हत्यार म्हणून वापर करत असून हे लोकशाहीसाठी घातक आहे. सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. आघाडीत बिघाडी झाल्याच्या बातम्या पेरल्या जात आहे परंतु बिघाडी आघाडीत नाही तर भाजपामध्ये दिसत आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपाकडून अडथळे निर्माण केले जात आहेत परंतु आकड्यांच्या गणित हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
तसेच काँग्रेसला दुसऱ्या जागेसाठी १२ मतांची आवश्यकता आहे तर भाजपाला पाचव्या उमेदवारासाठी २२ मते लागतात. तरीही पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांच्या भरवश्यावर भाजपा विजयाचा दावा करत आहे तो यावेळी चालणार नाही. महाविकास आघाडी भक्कम असून आवश्यक असलेले संख्याबळ मविआकडे असल्याने मविआचे सहाही उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.