Vidhan Parishad Election: धाकधूक वाढली, खलबतांना जोर, सोमवारी चमत्कार, अजित पवारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 08:06 AM2022-06-19T08:06:21+5:302022-06-19T08:06:56+5:30

Vidhan Parishad Election: विधान परिषद चमत्कार कुणाच्या बाजूने घडेल हे महाराष्ट्र सोमवारी बघेल. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्यांची विकेट जाईल, असे विधान करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीची उत्कंठा आणखीच वाढविली.

Vidhan Parishad Election: Dhakdhuk increased, Khalbatanna emphasis, miracle on Monday, claims Ajit Pawar | Vidhan Parishad Election: धाकधूक वाढली, खलबतांना जोर, सोमवारी चमत्कार, अजित पवारांचा दावा

Vidhan Parishad Election: धाकधूक वाढली, खलबतांना जोर, सोमवारी चमत्कार, अजित पवारांचा दावा

Next

 मुंबई : विधान परिषद चमत्कार कुणाच्या बाजूने घडेल हे महाराष्ट्र सोमवारी बघेल. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्यांची विकेट जाईल, असे विधान करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीची उत्कंठा आणखीच वाढविली. या निवडणुकीसाठी खलबते, बैठकांना जोर आला असून, चारही मोठ्या पक्षांचे आमदार पंचतारांकित हॉटेलांमध्ये मुक्कामी आहेत. 

महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, याकडे मुख्यमंत्र्यांचा कल आहे. त्यानुसार आमदारांच्या मतांच्या कोट्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. महाविकास आघाडीची एकजूट आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही, असा निर्वाळा अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

क्रॉसव्होटिंग होणार नाही याची दक्षता घेतानाच लहान पक्ष व अपक्षांची मते वळविण्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. ‘अर्थ’पूर्ण हालचाली मोठ्या प्रमाणात घडत असल्याची चर्चा आहे. २० जूनला होणाऱ्या निवडणुकीत दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात असून, एका उमेदवाराची विकेट निश्चित आहे. भाजपचे आमदार ताज प्रेसिडेन्सी, काँग्रेसचे आमदार फोर सीझन, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ट्रायडंट व शिवसेना आमदार वेस्टिन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.

गाठीभेटींनाही वेग
- काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सकाळी शरद पवार यांना भेटले. मविआचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. 
- भाजप नेते गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांनी आ. हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन केले. 
-आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांशी संवाद साधला. मतदान करताना कोणती खबरदारी घ्यायची याचे मार्गदर्शन सर्वच पक्ष करीत आहेत. 

पहिल्या पसंतीला महत्त्व
- कोणत्याच पक्षाकडे अतिरिक्त मते शिल्लक राहत नाहीत, त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते आपापल्या उमेदवारांना द्यावी लागतील. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २६ मतांचे गणित जुळवण्याच्या कामाला सर्व पक्ष लागले आहेत. 
- शिवसेनेसोबतच्या अपक्ष आमदारांची पळवापळवी दोन मित्र पक्षच करीत असल्याचेही चित्र आहे. मविआतील तीन पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक रविवारी होईल, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

यांचे पत्ते उघड नाहीत
तीन आमदार असलेली बविआ व प्रत्येकी २ मते असलेले एमआयएम व समाजवादी या पक्षांनी अद्याप पत्ते उघड केलेले नाहीत. राज्यसभेत एमआयएमने काँग्रेसला, तर सपाने मविआला पाठिंबा दिला होता. 

Web Title: Vidhan Parishad Election: Dhakdhuk increased, Khalbatanna emphasis, miracle on Monday, claims Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.