Vidhan Parishad Election: एकनाथ शिंदे, अजित पवारांचं शेवटच्या क्षणी मतदान; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 03:44 PM2022-06-20T15:44:01+5:302022-06-20T15:45:33+5:30
सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तेव्हापासून सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपानेही टप्प्याटप्प्याने आमदारांना मतदान करण्यास सांगितले.
मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान होत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत २७९ आमदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीसाठी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक आजारी असतानाही मतदानासाठी विधान भवनात दाखल झाले. आता या निवडणुकीच्या मतदानाला काही मिनिटं शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, एकनाथ शिंदे मतदान शेवटच्या क्षणी करत आहेत.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत नवाब मलिक, अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी हायकोर्टाने नाकारली. तर शिवसेनेचे अंधेरी पुर्वचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे विधान परिषदेसाठी २८५ आमदार मतदान करू शकतात. सकाळी ९ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत मतदानाची मुदत आहे. या निवडणुकीत कुठलाही दगाफटका बसू नये यासाठी प्रत्येक पक्षाने खबरदारी घेतली आहे.
सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तेव्हापासून सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपानेही टप्प्याटप्प्याने आमदारांना मतदान करण्यास सांगितले. दुपारी १२ च्या सुमारास शिवसेनेच्या आमदारांनी मतदानाल सुरूवात केली. आतापर्यंत २७९ आमदारांनी मतदान केले आहे. यानंतर आता महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील मतदानाला गेले आहे.
नवाब मलिक, अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टानेही परवानगी नाकारली
हायकोर्टाने मलिक-देशमुख यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर दोघांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. दुपारी २ वाजता ही सुनावणी सुरू झाली. तेव्हा जर मतदानाची परवानगी दिली तर मतदान करू शकता का? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या वकिलांना विचारणा केली. मात्र हायकोर्टाने उशीरा निकाल पत्र दिल्यामुळे सुप्रीम कोर्टात येण्यास उशीरा झाला असं सांगण्यात आले. परंतु या प्रकरणावर तातडीने निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार देत मतदानाला परवानगी देण्याची याचिका फेटाळून लावली.
मुख्यमंत्र्यांना धक्का बसेल - रवी राणा
महाविकास आघाडीची बिघाडी होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात मतांचे परिवर्तन भाजपाकडे झाले आहे. अपक्षांची मदत आणि काही मविआ आमदारांची साथ यामुळे भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून येईल. या निकालाचा परिणाम पाहून मुख्यमंत्र्यांना धक्का बसेल असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.