मुंबई - निवडणूक आल्यानंतर प्रत्येक पक्ष आपापली बांधणी करत असतो. विधान परिषद निवडणुकीत प्रत्येकाला मतांची गरज आहे. कुणीही आत्मविश्वासात राहू नये. राज्यसभेत जे घडले. शिवसेनेच्या संजय पवारांना जी मते मिळाली ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे मिळाली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामुळे मिळाली नाही असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.
माध्यमांशी राणा यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, विधान परिषदेत गुप्त मतदान आहे. त्यामुळे धक्कादायक निर्णय लागेल. अपक्षांसोबत बाकी पक्षाचे आमदारही गुप्त मतदान करणार आहे. अनपेक्षित निकाल यातून लागणार आहे. शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवा, मानसन्मान द्या, परंतु गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी आमदारांना विचारलं नाही. निधी दिला नाही. त्यामुळे नाराजी मोठ्या प्रमाणात आहे. राज्यसभेत सुद्धा पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले तरीही संजय राऊतांना काठावर निवडून आले. मातोश्रीमध्येही आमदारांना ठेवले तरी त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार आहे. या निवडणुकीत घोडेबाजार नाही तर अडीच वर्षातील नाराज आमदारांची खदखद बाहेर पडणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची रणनीती यशस्वी होणार आहे. शरद पवारांनंतर राज्यात धुरंधर नेते म्हणून देवेंद्र फडणवीस उदयास आले आहेत. विधान परिषदेत ते व्यवस्थित रणनीती करतील. अपक्ष शरीराने महाविकास आघाडीत असले तरी मनाने देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. शिवसेनेचे अनेक आमदार संपर्कात आहेत. खूप जण नाराज आहे. अनेकांनी फडणवीस असावेत असं म्हटलं. त्यामुळे विधान परिषदेत अपक्ष, शिवसेनेच्या नाराज आमदारांची मते भाजपाला पडतील. राज्यसभेच्या निवडणुकीत मी काम केले. आता विधान परिषदेतही माझे काम सुरू आहे. गुप्त मतदानासारखं गुप्त रणनीती सुरू आहे असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे. येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निकालात काय घडणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.