इकडे विधान परिषदेची निवडणूक, काँग्रेसचे आमदार वारीला निघून गेले, एकेक मत....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 10:38 AM2024-07-12T10:38:56+5:302024-07-12T10:41:09+5:30

Vidhan Parishad Election Updates: शिवसेना आणि काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांच्या उमेदवारांना एकडून तिकडून मते गोळा करावी लागणार आहेत. अशातच एकेक मत महत्वाचे असताना काँग्रेसचे बरेचसे आमदार फुटल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Vidhan Parishad election here in Maharashtra assembly, Congress MLAs left for Ashadhi Pandharpur Wari, each vote important | इकडे विधान परिषदेची निवडणूक, काँग्रेसचे आमदार वारीला निघून गेले, एकेक मत....

इकडे विधान परिषदेची निवडणूक, काँग्रेसचे आमदार वारीला निघून गेले, एकेक मत....

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना आणि काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांच्या उमेदवारांना एकडून तिकडून मते गोळा करावी लागणार आहेत. अशातच एकेक मत महत्वाचे असताना काँग्रेसचे बरेचसे आमदार फुटल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यातच एक आमदार एवढी महत्वाची निवडणूक असताना पंढरपूर वारीला निघून गेल्याने खळबळ उडाली आहे. 

पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप हे वारीला गेले आहेत. यामुळे ते मतदानाला उपस्थित राहतील की नाही हे काँग्रेसही सांगू शकत नाहीय. जगताप यांनी याबाबत पक्षाला कळविले होते, असे काँग्रेसने स्पष्ट केल्याचे वृत्त आजतकने दिले आहे. तर अन्य दोन बैठकीला अनुपस्थित असलेल्या आमदारांपैकी एक अशोक चव्हाणांचे खास जितेश अंतापुरकर आणि नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले बाबा सिद्धीकी यांचे पूत्र जीशान सिद्धीकी हे आहेत. 

काँग्रेसकडे जादाची १४ मते आहेत. यामुळे आणखी काही आमदार महायुतीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. सुलभा खोडके आणि हीरामन खोसकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. 

 नवाब मलिक देखील विधानभवनात पोहोचले आहेत. मलिकांनी काल शरद पवार गटाच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यांनी शरद पवार, जयंत पाटलांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे. यामुळे मलिक अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान करतात की शरद पवारांच्या याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

हे आहेत रिंगणात

भाजप : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर 
शिंदेसेना : भावना गवळी, कृपाल तुमाने 
अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे 
काँग्रेस : प्रज्ञा सातव 
उद्धवसेना : मिलिंद नार्वेकर 
शेकाप : जयंत पाटील 

मतांचे गणित काय...
भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडतात. 
शिंदेसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे ३९ आमदार असून त्यांना १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने ते सुस्थितीत आहेत.  
शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वत:च्या पक्षाचे एकच आमदार आहेत. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून त्यांचे १५ आमदार आहेत. याचा अर्थ जयंत पाटील यांच्याकडे १६ मते आहेत. त्यांना आणखी सात मतांची जुळवाजुळव करावी लागेल.  
अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्यांना आणखी सात मते लागतील. काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसमधील तीन मतांच्या भरवशावर त्यांचे गणित जुळेल, असे म्हटले जात आहे. 
उद्धवसेनेकडे १५ आमदार आहेत, त्यांना आणखी ८ मते लागतील. एक अपक्ष त्यांच्यासोबत आहेत. 
काँग्रेसची मते या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची आहेत. त्यांच्याकडे ३७ मते आहेत आणि त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची केवळ २३ मते लागतील. याचा अर्थ काँग्रेसकडे १४ मते अतिरिक्त आहेत, ती कुठे वळतात यावर बरेच अवलंबून असेल.

Web Title: Vidhan Parishad election here in Maharashtra assembly, Congress MLAs left for Ashadhi Pandharpur Wari, each vote important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.