Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीने पाच महत्वाच्या नेत्यांचे मतदान मागे ठेवले; दग्याफटक्याची शक्यता? कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 12:17 PM2022-06-20T12:17:30+5:302022-06-20T12:18:17+5:30
Maharashtra Vidhan Parishad Election Update: शिवसेनेच्या आमदारांची बस लेट झाली होती. वाहतूक कोंडीत अडकली होती. यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी भाजपा, राष्ट्रवादीनंतर मतदान करण्यास सुरुवात केली.
विधान परिषद निवडणुकीत आतापर्यंत २०३ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपाने १०४ हून अधिक आमदारांचे मतदान झाले आहे. तर राष्ट्रवादीने देखील आपल्या आमदारांचे मतदान पार पाडले आहे. परंतू, पाच महत्वाचे नेते मागे राहिल्याने ही नेमकी खेळी कशासाठी या बाबत चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेच्या आमदारांची बस लेट झाली होती. वाहतूक कोंडीत अडकली होती. यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी भाजपा, राष्ट्रवादीनंतर मतदान करण्यास सुरुवात केली. शिवसेनेच्या २० आमदारांनी आतापर्यंत मतदान केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारांना कोणाला, कसे मतदान केले याचे मार्गदर्शन केले. परंतू दोन आमदार विधान भवनात आलेच नव्हते. आणखी दोन आजी-माजी मंत्री तुरुंगात असल्याने ही दोन मते देखील राष्ट्रवादीला मिळणार नाहीएत.
दिलीप मोहिते पाटील, माणिकराव कोकाटे हे दोन आमदार विधान भवनात राष्ट्रवादीचे मतदान संपले तरी आले नव्हते. यामुळे चर्चा होऊ लागली होती. हे दोघेही वाहतूक कोंडीत अडकल्याचे वृत्तवाहिन्यांनी सांगितले. तसेच काही दगाफटका होऊ नये, भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची मतदानाची पद्धत-चाल, शिवसेना, काँग्रेसची मतदानाची पद्धत पाहूनच राष्ट्रवादीने पुढील मतदान करण्याची रणनिती आखली आहे. यामुळे जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी देखील मतदान केलेले नाही. यामुळे हे पाच नेते मागे ठेवण्यात आल्याचे समजते.
काँग्रेसच्याही ९ आमदारांचे मतदान बाकी आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात मतदान करू देण्यासाठी धाव घेतली आहे. तर अटक वॉरंट निघालेले अपक्ष आमदार रवी राणा यांनीदेखील नागपूर खंडपीठामध्ये अपील दाखल केले आहे.