Vidhan Parishad Election: निवडणूक आयोगाची परवानगी घेतली होती; भाजपानं काँग्रेसच्या आक्षेपाला दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 05:09 PM2022-06-20T17:09:33+5:302022-06-20T17:10:00+5:30
काँग्रेसकडून आमदार मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आले
मुंबई - राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या मतदानासाठी सर्वच पक्षांनी तयारी केली होती. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु आता काँग्रेसनंभाजपाच्या २ आमदारांवर आक्षेप घेतल्याने मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून काँग्रेसच्या आक्षेपावर निर्णय होत नाही तोपर्यंत मतमोजणीला सुरुवात होणार नाही.
काय आहे आक्षेप?
काँग्रेसकडून आमदार मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आले. या दोन्ही आमदारांच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीला सहकार्यासाठी मतदानासाठी घेतले. हे दोन्ही आमदार सही करू शकत होते मग मतदानाला दुसऱ्याला का पाठवले? यावर निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेतला आहे. यावर निर्णय होईल असं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाची घेतली परवानगी - भाजपा
काँग्रेसनं घेतलेले आक्षेप बालिशपणाचे, ३ दिवसापूर्वी निवडणूक आयोगाकडून अशाप्रकारे परवानगी घेतली आहे. लेखी परवानगी घेतली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतही असेच मतदान घेतले होते. नियमानुसार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी मतदान केले. मग आताच्या निवडणुकीत आक्षेप का? यात कुठलीही अडचण नाही. निवडणूक अधिकारी याबाबत निर्णय देतील. टाईमपास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा म्हणून हा आक्षेप घेण्यात आला आहे असा टोला भाजपा नेते गिरीश महाजन यांनी काँग्रेसला लगावला आहे.
हा तर असंवेदनशीलतेचा कळस - देवेंद्र फडणवीस
काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी हा तर असंवेदनशीलतेचा कळस असल्याचं म्हणत काँग्रेसच्या आक्षेपावर प्रतिक्रिया दिली आहे तर राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडी दोघांनीही मतदानावर आक्षेप घेतले होते. या निवडणुकीत भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मतदान केले होते. परिस्थिती बिकट असताना दोन्ही आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु महाविकास आघाडीने खालच्या पातळीचं राजकारण सुरू केले आहे. काँग्रेसनं या दोघांच्या मतदानावर आक्षेप घेतला ते दुर्देवी आहे असं भाजपा नेते संजय कुटे यांनी सांगितले आहे.