शुक्रवारी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीमधील मतांची मोठ्या प्रमाणावर फुटाफूट झाली होती. त्यामुळे महाविकास आघाडाचे तिसरे उमेदवार असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. या पराभवामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तसेच क्रॉस व्होटिंग करणारे आमदार कोण, याची चाचपणी महाविकास आघाडीकडून केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फुटलेल्या मतांबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फुटलेल्या आमदारांना जनतेनं जोड्यानं मारावं, असं संतप्त आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
महाविकास आघाडीमध्ये झालेल्या मतांच्या फुटाफुटीबाबत प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत जे आमदार फुटले आहेत. ते आमदार ज्या मतदारसंघातून निवडून आले आहेत त्या मतदारसंघातील जनतेला मी आवाहन करेन की, यांना जोड्यानं मारा. जर पक्ष निष्ठा सांभाळता येत नसेल, ज्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं, त्याचाच ऐनवेळी घात करणार असाल, तर एवढी नमक हरामी करणाऱ्याला सोडू नका, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी प्रज्ञा सातव ह्या पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाल्या होत्या. तर प्रतिस्पर्धी महायुतीचेही ९ उमेदवार सहज निवडून आले होते. अखेरीस ११ व्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात लढत झाली त्यात मिलिंद नार्वेकर विजयी झाले होते.