-कमलाकर कांबळे नवी मुंबई - विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून महाविकस आघाडीतील ठाकरे गटाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. पदवीधर मतदारसंघातून उध्दवसेनेचे अनिल परब यांनी २६ हजार २० मतांनी विजयी झाले आहेत. तर शिक्षक मतदारसंघातून उध्दवसेनेचे ज.मो. अभ्यंकर यांनीही निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांचाही विजय निश्चीत मानला जात आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय संपादीत करून विजयाची हॅटट्रीक साधतील, असे त्यांनी घेतलेल्या मतांच्या आघाडीवरून स्पष्ट झाले आहे.
निरंजन डावखरे यांना मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्यांतच तब्बल ३५ हजार मते पडली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे रमेश कीर यांना केवळ ७ हजार मते मिळाली होती. मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्या संपल्या असून डावखरे हे मतांची मोठी आघाडी घेवून विजयी झाले आहेत. मात्र सांयकाळी ७ वाजेपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा झाली नव्हती.
मुंबई शिक्षक मतदारसंघात पंचरंगी लढत झाली. या मतदारसंघात उध्दवसेनेचे अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, शिंदेसेना पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) शिवाजी नलावडे हे पाच उमेदवार रिंगणात होते. यात उध्दवसनेचे अभ्यंकर आघाडीवर आहेत.
मुंबई पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीतील उध्दवसेनेचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होती. परब यांनी चार पैकी पहिल्या दोन फेरीतच विजयासाठी जाहिर केलेला मतांचा कोटा गाठला. कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे निरंजन डावखरे यांनी विजयाची लय कायम ठेवत सलग तिसऱ्यांदा विजयाच्या वाटेवर आहेत.