मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने आत्मघात केला. स्वत:जवळ असलेली हक्काची ४४ मते देखील त्यांच्या आमदारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना दिली नाहीत. किमान तीन मते फुटली आणि पहिल्या क्रमांकाचे काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. पाठोपाठ शिवसेनेचीही मते फुटल्याचे स्पष्ट झाले.महाविकास आघाडीच्या आजच्या पराभवाचे तीव्र पडसाद येत्या काही दिवसात महाराष्ट्रात उमटण्याची व आरोप-प्रत्यारोपांच्या वादळात सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची दाट शक्यता आहे. सत्तारुढ तीन पक्षांमध्ये असलेला समन्वयांचा प्रचंड अभाव या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आला. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मला आईचं दूध विकणारा नराधम पक्षात नको’ असा इशारा शिवसेना आमदारांच्या बैठकीत दिला होता. मात्र, प्रत्यक्षात शिवसेनेचीही मते फुटल्याचे निकालावरून दिसते.काँग्रेसला पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे दोन्ही जागा जिंकण्यास ५२ मतांची गरज होती. त्यांच्याकडे ४४ मते असताना त्यांना बाहेरून आठ मते आणणे आवश्यक होते. शिवसेनेने त्यांच्याकडील चार जादाची मते काँग्रेसला देवू असा शब्द दिला होता. प्रत्यक्षात ही मते काँग्रेसकडे फिरली नाहीत असे निकालावरून दिसते. बाहेरून मते आणणे तर दूरच काँग्रेसला स्वत:ची ४४ मतेदेखील शाबूत ठेवता आली नाहीत. कारण, त्यांच्या दोन उमेदवारांना पहिल्या पसंतीची मिळालेली मते ४१ इतकीच आहेत.
Vidhan Parishad Election Result: काँग्रेसचा आत्मघात, महाविकास आघाडीत बिघाडी, राज्याच्या राजकारणात वादळ; राजकीय घडामोडींना येणार वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 7:49 AM