- अतुल जयस्वाल
अकोला : विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे वसंत खंडेलवाल यांनी विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरीया यांचा १०९ मतांनी पराभव केला. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मतगणगणा केंद्रांवरील सर्वच पाच टेबलवर खंडेलवाल यांची सरशी झाल्याचे दिसून आले.अकाेला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत विखुरलेल्या या मतदारसंघांत शिवसेनेकडे कधीही मतदारांचं बहुमत राहिलेले नाही, तरीही विद्यमान आमदार गाेपीकिशन बाजाेरीया यांनी विजयाचा ‘चमत्कार’ घडवून आला हाेता. यावेळी युती दुभंगली असल्याने, भाजपने वसंत खंडेलवाल यांच्यासारखा ताेडीस ताेड उमेदवार देऊन मतदारसंघात चुरस वाढविली हाेती. एकूण ८२२ मतदार असलेल्या या मतदार संघात १० डिसेंबर रोजी ८०८ मतदारांनी मतदान केले. मंगळवार, १४ डिसेंबर रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मतमोजणी झाली. मतमोजणीसाठी पाच टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. या पाचही टेबलवर खंडेलवाल यांनी बाजोरीया यांना मागे टाकल्याचे दिसून येत आहे. टेबल क्र. १ वर बाजोरीया यांना ८२, तर खंडेलवाल यांना ९४ मते मिळाली. टेबल क्र. २ वर बाजोरीया यांना ७७ तर खंडेलवाल यांना ९० मते मिळाली. याचप्रमाणे टेबल क्र. ३ वर बाजोरीया ५८, खंडेलवाल ८४, टेबल क्र. ४ वर बाजोरीया ४६, खंडेलवाल १०३, तर टेबल क्र. ५ वर बाजोरीया यांना ७१, तर खंडेलवाल यांना ७२ मते मिळाली. अशाप्रकारे खंडेलवाल यांना ४४३, तर बाजोरीया यांना ३३४ मते मिळाली. ३१ मते अवैध ठरली.