विधान परिषद निवडणुकीची धाकधूक वाढू लागली आहे. दोन वर्षांपूर्वी याच निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले होते. आता पुन्हा एकदा या निवडणुकीत मोठा खेळ होण्याची शक्यता असून ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. अशातच अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटचे दोन तास शिल्लक राहिल्याने कोण माघार घेणार की निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदेशिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी या दोन्ही गटांना मते फुटण्याची भीती आहे. मिलिंद नार्वेकर यांचे शिवसेनेच्या आमदारांशीच नाहीत तर खुद्द शिंदेंशीही चांगले संबंध आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे १७ ते १८ आमदार फुटण्याच्या वाटेवर आहेत. शरद पवारांच्या आश्रयाला जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे भाजपाचा स्वत:च्या आमदारांवर जरी विश्वास असला तरी शिंदे आणि पवार गटाच्या आमदारांनी दगाफटका केला तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे.
विधान परिषद निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याची वेळ आज दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. यामुळे महायुती एक पाऊल मागे घेणार की मविआ याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नार्वेकरांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक अटळ झाली आहे. यामुळे क्रॉस व्होटिंगही होण्याची शक्यता आहे. विधानसभेची आमदारकी ही आता जेमतेम तीन महिनेच उरली आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील अशी अपेक्षा आहे. यामुळे शरद पवार गटात जाऊ इच्छिणारे आमदार नार्वेकरांकडे आपली मते वळवू शकतात.
शिवाय शिंदे गटात आता जे आमदार आहेत, ते देखील एकेकाळी नार्वेकरांसोबत होते. मातोश्रीवर काही काम असेल तर नार्वेकरांनाच विचारावे लागत होते. यामुळे नार्वेकरांचे ज्यांच्याशी चांगले संबंध आहेत ते देखील मतांचा खेळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शिंदेंनी जेव्हा सूरत स्वारी केलेली तेव्हा नार्वेकरच मातोश्रीचा निरोप घेऊन त्यांना तिकडे भेटायला गेले होते. मुख्यमंत्री झाल्यावरही शिंदे ठाकरे गटातील नार्वेकरांनाच भेटले होते. यामुळे शिंदेही काही रसद नार्वेकरांना पुरवितात का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.