Vidhan Parishad Election: शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ; भाजप, काँग्रेसची अडचण, कसं जुळणार समीकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 12:06 PM2022-06-18T12:06:18+5:302022-06-18T12:07:02+5:30
Vidhan Parishad Election 2022: विधान परिषद निवडणुकीत पाचवी जागा निवडून आणणे भाजपसाठी प्रचंड जिकिरीचे दिसत असून, दुसरी जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसला मोठी कसरत करावी लागत आहे.
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत पाचवी जागा निवडून आणणे भाजपसाठी प्रचंड जिकिरीचे दिसत असून, दुसरी जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसला मोठी कसरत करावी लागत आहे.
भाजपचे नेते चमत्काराची भाषा करीत असले तरी, प्रत्यक्ष आकडेवारी बघता त्यांचा पाचव्या जागेवरील विजय कठीण दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीच्या आधी भाजपचे नेते रणनीतीवर लक्ष केंद्रित करीत होते. यावेळी ते विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात मश्गुल दिसत आहेत. लहान पक्ष आणि अपक्षांच्या मतांना याहीवेळी प्रचंड महत्त्व आले असले तरी, गुप्त मतदानाचा फायदा घेत मोठ्या पक्षांच्या मतांतही भाजपला फोडाफोडी करावी लागणार, अशी स्थिती आहे. लहान पक्ष आणि अपक्षांची तब्बल २९ मते आहेत.
भाजपचे नेते चमत्काराची भाषा पुन्हा एकदा करीत महाविकास आघाडीला डिवचण्याचे काम करत असल्याने आघाडीच्या आमदारांचे ऐक्य अबाधित ठेवून भाजपला धडा शिकवा, असा सूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री बोलाविलेल्या तीन पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत व्यक्त केला होता. हे ऐक्य कायम ठेवतानाच मतदानाचे अचूक व्यवस्थापन करण्यावर आघाडीकडून भर दिला जाणार आहे.
राऊत यांना माझा मताधिकार द्या : आ. भुयार
राज्यसभा निवडणुकीत मी महाविकास आघाडीला मतदान केले नाही, असा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता. मी महाविकास आघाडीसोबतच होतो आणि आहे. आता राऊत यांना विश्वास नसेल तर मी विधान परिषदेसाठी मत देत असताना राऊत यांना एकतर माझ्या बाजूला उभे करा किंवा माझे मत देण्याचा अधिकार त्यांना द्या, असा उपरोधिक टोला अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी हाणला.
आघाडीसोबतच, पण मत कोणाला ते नाही सांगणार
राऊत यांनी नाव घेतलेले दुसरे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी, ते महाविकास आघाडीसोबत असल्याचे सांगितले. पण मतदान कोणाला करणार ते सांगणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपचे जादूटोण्याचे दुकान आहे का? : राऊत
भाजपवाले सारखे चमत्कार करू म्हणताहेत, त्यांचे जादुटोण्याचे,लिंबू-मिरचीचे दुकान आहे का, असा सवाल शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केला.
थोरात, चव्हाण यांची अजित पवार यांच्याशी चर्चा
काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा केली. कोणाकडे निवडणुकीचे कौशल्य आहे आणि कोणाकडे नाही, हे निकालामध्ये कळेलच, असे आव्हान पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आधीच दिले आहे.
कुणाचे पारडे, किती जड?
शिवसेना
स्वत:ची मते ५५
अपक्षांची मते ७
एकूण ६२
राष्ट्रवादी
स्वत:ची मते ५१
अपक्षांची मते ४
एकूण ५५
काँग्रेस
स्वत:ची मते ४४
अपक्षांची मते ००
एकूण ४४
दोन जागांसाठी मते हवी ८
भाजप
स्वत:ची मते १०६
अपक्षांची मते ६
एकूण ११२
राज्यसभा निवडणुकीत मिळालेली मते १२३
पाचवी जागा निवडून आणण्यासाठीची मते १३०