मुंबई - राज्यसभेच्या ६ जागांच्या निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूका होणार आहेत. २० जूनला यासाठी मतदान होणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, दिवाकर रावते, संजय दौंड या आमदारांची मुदत संपली आहे तर रामनिवास सत्यनारायण सिंह यांचं निधन झाल्यानं ही जागा रिक्त आहे.
राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाने ३ उमेदवार उतरवल्याने बिनविरोध होणारी निवडणुकीची परंपरा खंडीत झाली आहे. तर विधान परिषदेतही भाजपाने ५ उमेदवार दिल्याने ही निवडणूकही महत्त्वाची मानली जाते. विधान परिषदेच्या या निवडणुकीत शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु या निवडणुकीतून सुभाष देसाई यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेने सचिन आहिर, आमशा पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सुभाष देसाई हे कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना ६ महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
या निवडणुकीबाबत सुभाष देसाई म्हणाले की, उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत मी स्वत: आहे. मी या निवडणुकीत अर्ज भरणार नाही. माघारीचा प्रश्न नाही मी उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत आहेत. विधान परिषद लढवायची नाही हा माझा निर्णय होता. २ जागांवर शिवसेना उमेदवार देईल. शिवसैनिक निवडून येईल हा माझ्यासाठी समाधानाचा विषय आहे. २ जणांना संधी दिली आहे असं त्यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या जागांवर निवडून येण्यासाठी २७ मतांची गरज असते. भाजपा आणि मित्रपक्ष मिळून ११३ संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपाच्या ४ जागा सहज निवडून येतील. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी, शिवसेनेच्या प्रत्येकी २ जागा निवडून येतील. परंतु काँग्रेसनं या निवडणुकीत २ उमेदवार दिल्यानं त्यांना दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी १२ मतांची गरज भासणार आहे.
भाजपानं दिली ५ जणांना संधीभाजपानं या निवडणुकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे.